ठाणे : ठाणे महापालिका मुख्यालयातील मोकळ्या जांगामधून खाली पडणाऱ्या वस्तूंमुळे दुर्घटना घडण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने तीन मजल्यांवर सुरक्षा जाळ्या बसवल्या आहेत. यापूर्वी अशा प्रकारे वस्तू खाली पडण्याच्या घटना घडल्या होत्या.
ठाणे महापालिका मुख्यालयात दररोज अधिकारी व कर्मचारी ये-जा करतात. तसेच विविध कामानिमित्त नागरिकही मोठ्या संख्येने येतात. मुख्यालयाच्या विविध मजल्यांवरील मोकळ्या जागांमधून खालील बाजूस वस्तू पडण्याची शक्यता असते. अशा वस्तू खाली उभ्या असलेल्या वा ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या अंगावर पडल्यास गंभीर दुखापत होऊ शकते. यापूर्वी अशा प्रकारच्या घटना घडल्या असल्या तरी त्यात कोणालाही दुखापत झाली नव्हती. मात्र, एखादी दुर्घटना घडल्यानंतर उपाययोजना करण्याऐवजी आधीच खबरदारी घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.
ठाणे महापालिका मुख्यालय विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सुरक्षेच्या जाळ्या बसवण्याचा प्रस्ताव पाठवला होता. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने मुख्यालयातील तीन मजल्यांवरील मोकळ्या जागांमध्ये जाळ्या बसवल्या आहेत. त्यामुळे वरच्या मजल्यावरून एखादी वस्तू खाली पडल्यास ती थेट खालच्या मजल्यावर वा नागरिकांच्या अंगावर पडण्याचा धोका कमी होणार आहे.
दरम्यान, मंत्रालयातही यापूर्वी मोकळ्या जागांमधून उडी मारून आत्महत्या करण्याच्या घटना घडल्या होत्या. अशा प्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी तेथेही सुरक्षेच्या जाळ्या बसवण्यात आल्या आहेत. ठाणे महापालिका मुख्यालयातही भविष्यात अशा प्रकारची घटना घडू नयेत. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही उपाययोजना करण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली.
ठाणे महापालिका मुख्यालयातील पॅसेजमधून खाली पडणाऱ्या वस्तूंमुळे दुर्घटना घडण्याची शक्यता लक्षात घेऊन तीन मजल्यांवरील पॅसेजमध्ये सुरक्षेच्या जाळ्या बसविण्यात आल्या आहेत, अशी माहिती ठाणे महापालिकेचे उपायुक्त गजानन गोदेपुरे यांनी दिली.
