ठाणे : राज्यात उन्हाचा पारा वाढू लागल्याने नागरिकांच्या आरोग्यावर त्याचे विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून या पार्श्वभूमीवर, ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने उष्माघातापासून बचाव करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. नागरिकांनी उन्हापासून बचाव करण्यासाठी काय करावे आणि काय टाळावे, याबाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
संपूर्ण राज्यासह ठाणे शहरातही उन्हाचा पारा वेगाने वाढत असून, नागरिकांना उष्माघाताचा मोठा धोका निर्माण झाला आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांच्या आरोग्यावर होणारे परिणाम लक्षात घेता, ठाणे महानगरपालिकेचा सार्वजनिक आरोग्य विभागाने एक विस्तृत आरोग्य मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केली आहे. त्यात नागरिकांनी उन्हापासून बचाव करण्यासाठी काय करावे आणि काय टाळावे, याबाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत. तसेच प्रौढ आणि लहान मुलांसाठी स्वतंत्र लक्षणे जाहीर केली आहेत.
उष्माघाताची लक्षणे ओळखा
शरीराचे तापमान १०४ फॅरन्हाईटपर्यंत (४० डिग्री सेल्सिअस) पोहोचल्यास स्नायूंचे आखडणे, मळमळणे, उलटीचा भास होणे, चिंता वाटणे व चक्कर येणे, हदयाचे ठोके वाढणे, धडधडणे अशी लक्षणे प्रौढांमध्ये आढळून येतात. तर, आहार घेण्यास नकार, चिडचिड होणे, लघवीचे कमी झालेले प्रमाण, शुष्क डोळे, कुठूनही रक्तस्त्राव होणे, तोंडाच्या येथील त्वचा कोरडी होणे, अशी लक्षणे लहान मुलांमध्ये आढळून येतात.
नागरिकांनी काय करावे?
उष्णतेवर मात करण्यासाठी प्रशासनाने काही प्रतिबंधात्मक उपाय सुचवले आहेत. घराबाहेर पडताना डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा. शक्य असल्यास हलके, सुती आणि पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करावे. तहान लागलेली नसली तरीही भरपूर पाणी प्या. शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवण्यासाठी ताक, लिंबू पाणी, नारळ पाणी यांसारख्या नैसर्गिक पेयांचा जास्तीत जास्त वापर करा. कडक उन्हाच्या वेळी, म्हणजेच दुपारी १२ ते ४ या दरम्यान शक्यतो घराबाहेर पडणे टाळा.
काय टाळावे?
उन्हाळ्यात काही गोष्टी टाळल्यास उष्माघाताचा धोका कमी होतो. यामध्ये उन्हात कष्टाची कामे करणे, अनवाणी चालणे किंवा दुपारी २ ते ४ या वेळेत स्वयंपाक करणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, कॅफिनयुक्त पेये जसे की चहा, कॉफी, मद्य आणि जास्त साखर असलेल्या शीतपेयांचे सेवन टाळावे, कारण यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. विशेषतः बंद उभ्या असलेल्या गाडीत लहान मुलांना किंवा पाळीव प्राण्यांना सोडून जाणे अत्यंत धोकादायक ठरू शकते.
नागरिकानो काळजी घ्या
नागरिकांनी उन्हापासून बचाव करण्यासाठी काय करावे आणि काय टाळावे, याबाबत मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. तसेच उन्हाळ्यात स्वतःची आणि लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन ठाणे महापालिकेचे मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद पाटील यांनी केले आहे.
