ठाणे : ठाणे म्हापलिका अग्निशमन, घनकचरा आणि उद्यान विभागांमध्ये नवीन ‘हायटेक’ वाहने दाखल झाली आहेत. यात उंच इमारतींमधील आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन विभागात आर्टिक्युलेटिंग वॉटर टॉवर वाहने, शहरातील रस्ते स्वच्छतेचा दर्जा उंचावण्यासाठी आधुनिक रोड स्वीपर मशिन्स, तसेच उद्यान विभागामध्ये धोकादायक वृक्षाच्या फांद्या छाटण्यासाठी हायड्रॉलिक एरियल लिफ्ट या वाहनांचा समावेश आहे. यामुळे आता आग विझवणे, रस्ते साफसफाई आणि झाडांच्या फांद्या छाटणी सुपरफास्ट होणार आहे.

ठाणे महानगरपालिकेच्या विविध विभागांसाठी अत्याधुनिक वाहनांचा मोठा ताफा शहरात दाखल झाला असून महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते बुधवारी या वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. या नव्या यंत्रणेमुळे शहरातील आपत्कालीन सेवा, स्वच्छता आणि पावसाळ्यापूर्वीची तयारी अधिक वेगाने आणि सुरक्षितपणे पार पडणार आहे. या कार्यक्रमाला उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हणमंत जगदाळे, विरोधी पक्ष नेते अशरफ शानू पठाण तसेच पालिका अधिकारी आणि नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ठाणे अग्निशमन विभागाची एकूण १२ अग्निशमन केंद्रे चोवीस तास कार्यरत असून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना त्वरित सेवा देण्याचे काम सातत्याने केले जात आहे. ही यंत्रणा अधिक सक्षम व्हावी यासाठी अद्ययावत आणि सुसज्ज फायर वाहने ताफ्यात समाविष्ट करण्यात आली असल्याचे महापौर पिंपळोलकर यांनी स्पष्ट केले. ही वाहने पूर्णपणे स्वयंचलित स्वरूपाची आहेत. प्रत्येक वाहनामध्ये चार हजार लिटर पाण्याची क्षमता आहे. तसेच, प्रथमच मल्टी आर्टिक्युलेटिंग वॉटर टॉवर वाहनेही ठाणे अग्निशमन दलात दाखल झाली असून ३५ मीटर उंचीपर्यत पोहचून आग विझवण्याची क्षमता या वाहनांची आहे. यामुळे उंच इमारतींमधील आगीवर नियंत्रण मिळवणे आता अधिक सोपे होणार आहे, असा दावा पालिकेने केला आहे.

ठाणे महानगरपालिका शहरातील रस्ते साफसफाई आधुनिक पध्दतीने करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत एकूण चार मॅकेनिकल रोड स्वीपर मशीन मुख्य रस्त्यांच्या साफसफाईसाठी वापरण्यात येणार आहेत. या उपक्रमाची प्रमुख उद्दिष्टे म्हणजे रस्त्यांची स्वच्छता राखून आरोग्यदायी वातावरण निर्माण करणे, हाताने स्वच्छतेवरील अवलंबित्व कमी करणे, धूळमुक्त परिसर करणे आणि स्वच्छता अधिक अत्याधुनिक पध्दतीने करण्यास मदत होणार असल्याचे महापौर पिंपळोलकर यांनी स्पष्ट केले.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर धोकादायक वृक्षाच्या फांद्या छाटण्याकरिता हायड्रॉलिक एरियल लिफ्टची ५ वाहने दाखल झाली आहेत. बोलेरो पिकअप वाहनावर बसवलेली हायड्रॉलिक एरियल लिफ्ट बसविण्यात आली असून दुहेरी स्विंग आर्म यंत्रणा असलेली १० मीटर कार्यरत उंचीची हायड्रॉलिक एरियल लिफ्ट आहे. ही लिफ्ट साध्या शिडीपेक्षा अधिक सुरक्षित असून या माध्यमातून धोकादायक अति उंच वृक्षांच्या फांद्या छाटणीचे काम जलदगतीने होण्यास मदत होणार आहे, असा दावा पालिकेने केला आहे.