ठाणे : गेल्या दोन दिवसांपासून ठाणे शहरात पावसाचा जोर वाढला असतानाच, हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका यंत्रणा सज्ज असून या यंत्रणेने मंगळवारी रस्त्यावर उतरून संपूर्ण शहरातील परिस्थितीचा आढावा घेतला.

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिकांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि संजय हेरवाडे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत शहरातील विविध ठिकाणांची पाहणी केली.

सर्व नाल्याची साफसफाई करणे, शहरात सखल भागात पाणी साचणार नाही, धोकादायक इमारती तसेच वृक्ष पडून जीवित व वित्तहानी होणार नाही याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना संदीप माळवी यांनी संबंधितांना दिल्या. तसेच पाणी साचणाऱ्या ठिकाणी पंप लावून पाण्याचा निचरा करणे, तसेच रस्त्यावर पडलेली झाडे, झाडांच्या फांद्या, रस्त्यांवरील डेब्रिज तात्काळ उचलण्याचे निर्देशबी त्यांनी संबंधितांना दिले.