ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध भागांना गेल्या काही दिवसांपासून पाणी टंचाईच्या झळा बसत असतानाच, कळवा पुर्वेतील भास्करनगर, पौंडपाडा, पवनपाडा भागातही महिन्यात केवळ चार वेळा अवघ्या अर्ध्या तासासाठी पाणीपुरवठा होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. याच मुद्द्यावरून आप पक्षाने पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन करत मडकी फोडून प्रशासनाचा निषेध नोंदविला. तसेच पाणी समस्या दूर झाली नाहीतर अर्धनग्न होऊन आंघोळ करू, असा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला.
ठाणे महापालिकेला क्षेत्रात दररोज ५९० दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा होत असला तरी, लोकसंख्येच्या मानाने तो पुरेसा नाही. यामुळेच शहरात अनेक भागात पाणी टंचाईची समस्या निर्माण होत आहे. उन्हाळ्यात तापमान वाढीमुळे धरण क्षेत्रातील पाणी आटते. त्यामुळे पावसाळा सुरू होईपर्यंत म्हणजे, जुनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत धरणातील पाणीसाठा पुरविण्यासाठी कपात लागू करण्यात येते. त्यामुळे शहरात टंचाईची समस्या निर्माण होते. अद्याप तरी कपात लागू करण्यात आली नसली तरी विविध कारणांमुळे पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येत असल्याने टंचाईच्या समस्येत वाढ होत असल्याचे चित्र आहे. असे असतानाच, कळवा पूर्वेतील भास्कर नगर, पौंड पाडा आणि पवनपाडा परिसरात महिन्यातून केवळ चार वेळा अवघ्या अर्ध्या तासासाठी पाणीपुरवठा होत असल्याचा आरोप या भागातील तीव्र पाणीटंचाईच्या प्रश्नावरून आम आदमी पक्षाने करत ठाणे महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर निदर्शने केली. नागरिकांनी रिकामे कॅन वाजवले तर काहींनी मडकी फोडून प्रशासनाचा निषेध नोंदविला.
परिसरात तीन जलकुंभ असतानाही नियमित पाणी मिळत नसल्याने लाखो नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या भागातील नागरिक करदाते असूनही त्यांना मूलभूत सुविधा मिळत नाहीत. विभागीय पाणीपुरवठा अधिकारी त्यांची जबाबदारी योग्य प्रकारे पाडत नाही, असा आरोप आम आदमी पक्षाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष अमर आमटे यांनी केला. समस्या तातडीने सोडवली नाही तर शेकडो कार्यकर्ते आणि नागरिक महापालिका आवारात अर्धनग्न होऊन आंघोळ करत तीव्र आंदोलन छेडतील, असा इशाराही त्यांनी दिला. महापालिका प्रशासनाने तातडीने दखल घेऊन नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा सुनिश्चित करावा, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. दरम्यान, ठाणे महापालिका पाणी पुरवठा विभागाचे उपनगर अभियंता विनोद पवार यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांची समस्या जाणून घेत ती सोडविण्याचे आश्वासन दिले.
