ठाणे : ठाणे महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागासाठी अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज अशा दोन कार्डियाक रुग्णवाहिका उपलब्ध झाल्या असून सीएसआर निधीतून रुग्णवाहिका उपलब्ध झाल्याने पालिकेचा एकही रुपया खर्च झालेला नाही. या रुग्णवाहिकेमुळे ‘गोल्डन अवर’मध्ये रुग्णांना योग्य उपचार मिळणार असल्याने त्यांचे जीव वाचण्याची शक्यता आहे. त्यामुळे या रुग्णवाहिका जीवनदायी ठरणार असल्याने ठाणेकरांसाठी ही दिलासादायक बातमी आहे.
फर्स्ट क्रेडीट सर्व्हिसेस आणि इनरव्हील डिस्ट्रिक्ट ३१४ यांच्या सीएसआर निधीतून या रुग्णवाहिका ठाणे महापालिकेला उपलब्ध झालेल्या आहेत. ठाणे महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात शनिवारी आयोजित कार्यक्रमात या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या रुग्णवाहिकेचे लोकार्पण खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते पार पडले. या सोहळ्यास महापौर शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमास उपायुक्त जी.जी. गोदेपुरे, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद पाटील, माता-बाल संगोपन अधिकारी वर्षा ससाणे, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा लक्ष्मी सिंग, प्रोजेक्ट मॅनेजर डॉ. छाया भडकमकर, सदस्य सुनीता जैन आदी मान्यवर उपस्थित होते. ‘गोल्डन अवर’मध्ये योग्य उपचार मिळाल्यास रुग्णाचा जीव वाचण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते. या कार्डियाक रुग्णवाहिका अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांनी सुसज्ज असून, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तातडीने उपचार सुरू करण्याची सुविधा रुग्णवाहीकेत आहे. ‘गोल्डन अवर’मध्ये योग्य उपचार मिळून रुग्णाचे जीव वाचण्याची शक्यता आहे. त्यामुळे या रुग्णवाहिका ठाणेकरांसाठी जीवनदायी ठरणार आहेत.
रुग्णवाहिकांमध्ये लहान मुलांसाठी व्हेंटिलेटर, सिरिंज पंप, प्राणवायु पुरवठा यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत, तसेच प्रौढ रुग्णांसाठी आवश्यक असलेली अत्याधुनिक वैद्यकीय यंत्रणाही बसविण्यात आली आहे. यामुळे आपत्कालीन परिस्थितीत त्वरित आणि प्रभावी उपचार देणे शक्य होणार आहे. खासदार नरेश म्हस्के यांनी महापौर असताना या प्रकल्पासाठी पुढाकार घेतला होता. त्यांच्या प्रयत्नातून आणि विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने हा उपक्रम साकार झाला. कोविड काळातही रोटरी क्लब व इनरव्हील क्लब यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. तर, या रुग्णवाहिका हृदयविकाराच्या रुग्णांसाठी अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज असून, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तात्काळ उपचार देण्यास सक्षम असून या रुग्णवाहिकांमुळे रुग्णांचे प्राण वाचवण्यास या रुग्णवाहिका अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी सांगितले.
