राज्य शासनाने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातली असतानाही होळी आणि धुळवडीला पातळ पिशव्यांची विक्री सर्रास सुरू आहे. याविरोधात ठाणे महापालिकेने खास पथके तयार केली आहेत. गेल्या दोन दिवसांत ५० किलो प्लास्टिकच्या पिशव्या जप्त करून विक्रेत्यांकडून सुमारे ६५ हजारांचा दंड वसूल केला आहे.
मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली यांसारख्या शहरांमध्ये सर्रासपणे अशा पिशव्यांची विक्री होताना आढळून आले आहे. ठाण्यातील प्रमुख बाजारपेठांमध्येच अशा कमी जाडीच्या पिशव्या मिळू लागल्याने यावर प्रशासकीय यंत्रणेचे नियंत्रण राहिले नसल्याचे स्पष्ट झाले होते. घनकचरा विभागाने प्रत्येक प्रभाग समितीत विशेष पथके तयार केली आहेत. प्रभाग समितीमधील मुख्य स्वच्छता निरीक्षक, चार स्वच्छता निरीक्षक आणि कर्मचारी अशा दहा जणांचा पथकात समावेश आहे.  पथक प्रभाग समितीच्या हद्दीत गस्त घालून अशा पिशव्यांची विक्री करणारे व्यापारी तसेच विक्रेत्याविरोधात कारवाई करीत आहे. गेल्या दोन दिवसात या पथकाने ५० किलो प्लास्टिकच्या पिशव्या जप्त करून  सुमारे ६५ हजारांचा दंड वसूल केल्याची माहिती पालिकेचे जनसंपर्क अधिकारी संदीप माळवी यांनी दिली.

कारवाईने धाबे दणाणले
ठाणे पोलिसांनी आरोग्यास घातक असलेले रंग,प्लास्टिक पिशव्यांची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना नोटिसा बजावल्या असतानाच पालिकेच्या विशेष पथकाने जप्ती व दंडात्मक कारवाई सुरू केल्याने व्यापारी व विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.