ठाणे : ठाणे महापालिकेची निवडणूक युतीत लढविण्यात आली असल्यामुळे महापौर पद द्या अन्यथा विरोधी पक्ष म्हणून भूमिका बजावू, असा हट्ट धरणाऱ्या भाजपने अखेर माघार घेत शिवसेना (शिंदे गट) पक्षासोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. शिवसेना (शिंदे गट) पक्षातर्फे महापौर पदासाठी शर्मिला पिंपळोलकर तर भाजपतर्फे उपमहापौर पदासाठी कृष्णा पाटील यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केले असून त्यांच्याविरोधात उमेदवारी अर्ज दाखल झालेले नसल्यामुळे दोघांची बिनविरोध निवड झाली आहे. येत्या ३ फेब्रुवारीला केवळ अधिकृत निवडीची औपचारीकता शिल्लक राहिलेली आहे.
ठाणे महापालिका निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेचे ७५, भाजपचे २८, राष्ट्रवादी (शरद पवार) १२, राष्ट्रवादी (अजित पवार) ९, एमआयएम ५, शिवसेना (उबाठा) १, अपक्ष १ असे १३१ नगरसेवक निवडून आले आहेत. या निवडणुक निकालानंतर ३ फेब्रुवारी रोजी महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणुक जाहीर झाली. शिंदे गटाच्या शिवसेनेने ७५ नगरसेवक निवडून आणले असून, एका अपक्ष नगरसेवकाने पाठिंबा दिल्यामुळे हे संख्याबळ ७६ वर गेले आहे. ठाणे महापालिकेत सत्तास्थापनेसाठी ६६ नगरसेवकांचे संख्याबळ आवश्यक आहे. त्यामुळे शिंदे सेनेचा महापौर होणार हे जवळपास निश्चित मानले जात होते.
ठाणे महापालिका महापौर पदासाठी अनुसूचित जातीचे आरक्षण जाहीर झाल्यामुळे शिंदे सेनेतील आठ नगरसेवकांच्या नावाची चर्चा होती. शिंदेच्या शिवसेनेकडून अनुसूचित जाती प्रवर्गातील तब्बल सात नगरसेवक निवडून आले आहेत. यामध्ये प्रभाग ३ (अ) मधील पद्मा भगत, ६ (अ) मधील वनिता घोगरे, ७ (अ) मधील विमल भोईर, ९ (अ) मधील गणेश कांबळे, १६ (अ) मधील डॉ. दर्शना जानकर, २४ (अ)मधील आरती गायकवाड आणि २८ (अ)मधील दीपक जाधव यांचा समावेश होता. या सात जणांसह कोपरी येथील सर्वसाधारण प्रभागातून निवडणूक लढवलेल्या शर्मिला पिंपोळकर यांचेही नाव चर्चेत होते. यापैकी शर्मिला पिंपळोलकर यांच्या नावावर पक्षाने अखेर शिक्कामोर्तब केला. तर, भाजपने उपमहापौर पदासाठी कृष्णा पाटील यांची निवड केली. महापौर, उपमहापौर निवडणुकीसाठी ३० जानेवारी रोजी दुपारी २ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत होती. या दिवशी महापौर पदासाठी शिंदेच्या शिवसेनेतर्फे शर्मिला पिंपळोलकर यांनी अर्ज दाखल केला तर, भाजपातर्फे उपमहापौर पदासाठी कृष्णा पाटील या अर्ज दाखल केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हे अर्ज दाखल करण्यात आले. त्यांच्याविरोधात उमेदवारी अर्ज दाखल झालेले नसल्यामुळे दोघांची बिनविरोध निवड झाली आहे. येत्या ३ फेब्रुवारीला केवळ अधिकृत निवडीची औपचारीकता शिल्लक राहिलेली आहे.
भाजपने हट्ट सोडला
ठाणे महापालिकेची निवडणूक युतीत लढविण्यात आली असल्यामुळे महापौर पद भाजपला देण्याचा प्रस्ताव भाजपने शिंदे गटाच्या शिवसेनेपुढे मांडला होता. महापौर पद मिळाले नाहीतर विरोधी पक्षाची भूमिका बजावू, असे इशारे भाजपने दिले होते. मात्र, शिंदे सेना महापौर पद सोडण्यास नकार दिला. त्याऐवजी पाच वर्षांच्या कालावधीत पहिले व शेवटचे सव्वा वर्ष उपमहापौर पद, तीन प्रभाग समित्या आणि दोन विशेष समित्या भाजपला देण्याची तयारी शिंदे सेनेने दर्शविली. भाजपनेही यासोबत स्थायी समिती आणि परिवहन समितीचे सभापती पद प्रत्येकी एक वर्ष देण्याची मागणी केली. दरम्यान, दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर भाजपने महापौर पदाचा हट्ट सोडत शिंदेंच्या सेनेसोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला.
कोपरीला पहिल्यांदा महापौर पद
ठाणे, वागळे इस्टेट परिसरातील नगरसेवकांना आजवर महापौर पदे मिळाली. ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के हे आनंदनगर भागातून नगरसेवक निवडून येत होते. हा कोपरी परिसराचा भाग असला तरी तो वागळे इस्टेट परिसराशी जोडण्यात आला होता. यामुळे म्हस्के हे महापौर झाले, तेव्हा हे पद वागळे विभागाकडे गेले होते. कोपरी भागाला अद्याप महापौर पद मिळाले नव्हते. गोपाळ लांडगे यांचे यापुर्वी नाव चर्चेत येऊनही ते महापौर होऊ शकले नव्हते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोपरी भागातून निवडून येणाऱ्या शर्मिला पिंपळोलकर यांना महापौर पदाची उमेदवारी दिली असून या निमित्ताने कोपरीला पहिल्यांदा महापौर पद मिळाले आहे.

