ठाणे : ठाणे महापालिका निवडणुक युतीत लढविली असल्यामुळे महापौर पद देण्याचा प्रस्ताव भाजपने शिंदेच्या शिवसेनेपुढे मांडला असला तरी, शिंदे सेना महापौर पद देण्यास तयार नसल्याचे वृत्त आहे. पाच वर्षातील पहिले आणि शेवटचे सव्वा वर्षे उपमहापौर, तीन प्रभाग समित्या आणि दोन विशेष समित्या देण्याची तयारी शिंदे सेनेने दाखविली आहे. परंतु यासह भाजपनेही स्थायी समिती आणि परिवहन समिती सभापती पद एक-एक वर्ष देण्याचा आग्रह धरला आहे, अशी माहिती राजकीय सुत्रांनी दिली.

ठाणे महापालिकेची निवडणुक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत एकूण ६४९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यापैकी शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे सात उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. यामुळे १२५ जागांसाठी ६४३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. या निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेचे ७५, भाजपचे २८, राष्ट्रवादी (शरद पवार) १२, राष्ट्रवादी (अजित पवार) ९, एमआयएम ५, शिवसेना (उबाठा) १, अपक्ष १ असे १३१ नगरसेवक निवडून आले आहेत. ठाणे महापालिकेत सत्तास्थापन करण्यासाठी ६६ नगरसेवक इतके संख्याबळ आवश्यक आहे.

शिंदेच्या सेनेने ७५ नगरसेवक निवडून आणले असून अपक्ष नगरसेवकाने शिंदे सेनेला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शिंदेच्या सेनेतील नगरसेवकांचे संख्याबळ ७६ इतके झाल्याने त्यांच्याच पक्षाचा महापौर होईल, अशी शक्यता आहे. असे असले तरी निवडणुक युतीत लढली असल्यामुळे किमान दोन वर्षे महापौर पद देण्याची मागणी भाजपने केली होती.

ठाणे महापालिकेतील जागा वाटपाबाबत शिंदेची शिवसेना आणि भाजप नेत्यांची अंतिम बैठक अद्याप झालेली नाही. शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे जयंती कार्यक्रम आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन यामुळे अंतिम बैठक होऊ शकलेली नाही. महापौर पदाच्या उमेदवारांचे अर्ज शुक्रवारी ३० जानेवारी रोजी भरण्याची अंतिम मुदत आहे. यामुळे गुरूवारी रात्री दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये बैठक होण्याची शक्यता आहे. असे असले तरी, यापुर्वी दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये प्राथमिक बोलणी झालेली असून त्यात शिंदे सेना महापौर पद देण्यास तयार नसल्याचे वृत्त आहे.

पाच वर्षातील पहिले आणि शेवटचे सव्वा वर्षे उपमहापौर पद, तीन प्रभाग समित्या आणि दोन विशेष समित्या पाच वर्षे देण्याची तयारी शिंदे सेनेने दाखविली आहे. परंतु भाजप नेत्यांनी त्याहून अधिकची मागणी केली आहे. पाच वर्षातील पहिले आणि शेवटचे सव्वा वर्षे उपमहापौर पद, तीन प्रभाग समित्या आणि दोन विशेष समित्या पाच वर्षे देण्यासह भाजपनेही स्थायी समिती आणि परिवहन समिती सभापती पद एक-एक वर्ष देण्याचा प्रस्ताव मांडला आहे, अशी माहिती राजकीय सुत्रांनी दिली.

ठाणे महापालिकेत महापौर पद तसेच इतर पद देण्याबाबत दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये प्राथमिक बोलणी झाली असली तरी, शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे जयंती कार्यक्रम आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन यामुळे अंतिम बैठक होऊ शकलेली नाही. प्राथमिक बोलणीत आम्ही आमचा प्रस्ताव मांडला आहे तर, शिंदेने सेनेही त्यांचा प्रस्ताव दिला आहे. अंतिम बैठकीनंतर त्यावर पक्षाचे वरिष्ठ नेते अंतिम निर्णय घेतील. – संदिप लेले, ठाणे जिल्हाध्यक्ष (भाजप)