ठाणे : मान्सून काळात नागरिकांना तात्काळ आणि प्रभावी सेवा देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम करण्याचा निर्णय ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी घेतला असून त्याचाच एक भाग म्हणून आपत्ती व्यवस्थापन विभागात अतिरिक्त समन्वय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय, प्रभाग समितीनिहाय विशेष पथकेही स्थापन करण्यात आली आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला भेट देऊन तेथील कामकाजाचा आढावा घेतला होता. नागरिकांच्या तक्रारींवर तात्काळ कारवाई होत नसल्याच्या तक्रारी काही नगरसेवकांनी यावेळी शिंदे यांच्याकडे केल्या. यावरूनच शिंदे यांनी पालिका अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावत त्यांच्यावर कारवाईचा इशारा दिला होता. आपत्ती व्यवस्थापन विभागात पुरेसे मनुष्यबळ नसल्याचे पालिका प्रशासनाकडून यावेळी सांगण्यात येताच, इतर विभागातील कर्मचाऱ्यांची मदत घेण्याबरोबरच अतिरिक्त मनुष्यबळ घेऊन नागरिकांच्या तक्रारीचा तात्काळ निपटारा करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभाग सक्षम करण्याचे निर्देश शिंदे यांनी दिले होते. या निर्देशानंतर मान्सून काळात नागरिकांना तात्काळ आणि प्रभावी सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असून त्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कामकाजाचा समन्वय अधिक प्रभावी करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागात अतिरिक्त समन्वय अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे.
याशिवाय, प्रभागांमध्ये मान्सूनशी संबंधित समस्यांचे तात्काळ निवारण व्हावे यासाठी प्रभागनिहाय विशेष पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकांमध्ये अभियंते, उद्यान व वृक्ष प्राधिकरणातील अधिकारी-कर्मचारी तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांचा समावेश आहे. ही पथके संबंधित प्रभागांमध्ये सुरू असलेल्या वृक्ष छाटणीच्या कामांवर देखरेख ठेवणार असून छाटलेल्या फांद्यांचे त्वरित स्थलांतर, वादळी वाऱ्यामुळे वृक्ष किंवा फांद्या पडल्यास त्यांचे तातडीने हटविणे तसेच मान्सून काळात उद्भवणाऱ्या विविध समस्यांवर तत्काळ कार्यवाही करणार आहेत. तसेच संबंधित प्रभागातील पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या सातत्याने संपर्कात राहून त्यांच्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या तक्रारी आणि समस्यांचे त्वरित निराकरण करण्यात येणार आहे, असे पालिकेने म्हटले आहे.
स्वतंत्र समन्वय पथके
महापालिकेचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींसोबत नियमित समन्वय राखण्यासाठी परिमंडळनिहाय मुख्यालय स्तरावर स्वतंत्र समन्वय पथकेही नियुक्त करण्यात आली आहेत. ही पथके प्रभागांतील समस्या जाणून घेऊन त्या संबंधित विभागांकडून तातडीने सोडवून घेण्याचे काम करतील. तसेच समस्या निकाली निघाल्यानंतर त्याबाबतची माहिती संबंधित पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींना त्वरित देण्यात येणार आहे. महापालिकेने मान्सून काळात नागरिकांना जलद आणि प्रभावी सेवा देण्यासाठी समन्वय यंत्रणा अधिक मजबूत करण्यावर भर दिला असून विविध विभागांमधील समन्वय वाढवून आपत्ती व्यवस्थापन अधिक कार्यक्षम करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.
