ठाणे : पावसाळ्याच्या कालावधीत दुर्घटना रोखण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाने आतापासूनच पाऊले उचलली असून त्याचाच एक भाग म्हणून शहरातील पाणी तुंबणारे भाग, उघडी मनहोल आणि भूस्खलनाच्या धोक्याच्या ठिकाणांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी २४ तास आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवत पाणी साठणाऱ्या ७० ठिकाणी पंप बसविणे, मनहोल झाकण बसविणे आणि धोकादायक भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्यासाठी नोटीसा बजावण्याची मोहीम हाती घेण्यात येणार आहे.

पावसाळ्याच्या कालावधीत आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊन दुर्घटना घडतात. अशी संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी ठोस पालिका प्रशासनाने आतापासूनच उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे. पाणी तुंबणे, उघडी मनहोल, भूस्खलन आणि सखल भागातील पूरस्थिती लक्षात घेऊन यंदा विशेष खबरदारी घेतली जाणार आहे. महापालिकेचा आपत्कालीन विभाग २४ तास कार्यरत ठेवण्यात आला असून मुख्यालयात नियंत्रण कक्ष सज्ज झाला आहे. येथे दोन शिफ्टमध्ये २० कर्मचाऱ्यांची टीम तैनात असून टिडीआरएफचे ३० जवान आणि पुढील तीन महिन्यांसाठी एनडीआरएफचे २५ जवान शहरात दाखल होणार आहेत. तसेच प्रत्येक प्रभाग समिती स्तरावरही १० जणांच्या टीम तयार ठेवण्यात आल्या आहेत. या संदर्भात ठाणे महापालिकेचे उपायुक्त गजनान गोदेपुरे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी पावसाळ्याच्या कालवधीत आपत्कालीन परिस्थितीत दुर्घटना घडू नये यासाठी आतापासूनच यंत्रणा सज्ज ठेवण्याची तयारी असून आपत्तीचा सामना करण्यासाठी नियोजन आखणे आणि बैठका घेण्याचे काम १५ मेपर्यंत पुर्ण केले जाणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

उघड्या मनहोलवर विशेष लक्ष मुंबईत काही वर्षांपुर्वी पाणी तुंबलेल्या भागातील मनहोलमध्ये पडून एका डाॅक्टरचा मृत्यु झाला होता. अशी दुर्घटना पुन्हा घडू नये यासाठी महापालिकेकडून विशेष मोहीम राबवली जाणार आहे. शहरातील सर्व मनहोलची तपासणी करून ज्या ठिकाणी झाकण नाही, तेथे तातडीने झाकण बसविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ठाण्यातील इंदिरानगर-लोकमान्यनगर, कळवा आणि मुंब्रा येथील डोंगराळ भागांमध्ये भूस्खलनाचा धोका लक्षात घेता तेथील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्यासाठी नोटिसा बजावल्या जाणार आहेत.

७० ठिकाणी पंप बसविण्याची तयारी शहरातील सखल आणि पाणी साचणाऱ्या सुमारे ७० ठिकाणी पंप बसविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नालेसफाई आणि गटार स्वच्छतेची कामे ३१ मेपर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. मासुंदा तलावातील पाणी ओसंडून बाजारपेठेत साठते. यंदा समस्या टाळण्याचा प्रयत्न आहे. तलावात मोटार बसवून पाणी ओसंडून वाहण्याआधीच कल्व्हर्टद्वारे नाल्यात सोडण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे व्यापारी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. पावसाळ्यात वीजेच्या तारा तुटून अपघात होऊ नयेत यासाठी महावितरण आणि टोरंट कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन सर्व दुरुस्तीची कामे ३१ मेपूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या जाणार आहेत.