ठाणे : महापालिका महापौर पदाच्या निवडीची सोडत गुरुवारी मुंबईत काढली जाणार असून या सोडतीनंतर नव्या महापौराची निवड केली जाणार आहे. एकूणच महापौर निवडीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून या नव्या महापौरासह पदाधिकाऱ्यांच्या स्वागताची तयारी पालिका प्रशासनाकडून सुरू केली आहे. त्यासाठी पालिका मुख्यालयातील पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयांची साफसफाई सुरू करण्यात आली आहे.
ठाणे महापालिकेची निवडणुक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेचे ७५, भाजपचे २८, राष्ट्रवादी (शरद पवार) १२, राष्ट्रवादी (अजित पवार) ९, एमआयएम ५, शिवसेना (उबाठा) १, अपक्ष १ असे १३१ नगरसेवक निवडून आले आहेत. शिंदेची शिवसेना आणि भाजपने युतीत निवडणुक लढविली असून या दोन्ही पक्षांनी १३१ पैकी महायुतीच्या १०३ जागा निवडून आणल्या आहेत. शिंदे यांच्या पक्षाला ७५ तर, भाजपला २८ जागा मिळाल्या आहेत.
शिंदेच्या शिवसेनेने बहुमताचा आकडा पार केला असला तरी, युतीत निवडणुका लढविल्यामुळे भाजपनेही महापौर पदावर दावा केला आहे. एकीकडे महापौर पदावरून दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू असतानाच, दोन्ही पक्षातील नगरसेवकांनी हे पद पदरात पाडून घेण्यासाठी पक्ष नेत्यांकडे मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
महापौर पदाच्या निवडीची सोडत सोडत गुरुवारी मुंबईत काढली जाणार आहे. या सोडतीनंतर महापौर पदासाठी नेमके कोणते आरक्षण असेल हे स्पष्ट होईल आणि यानंतर त्यावर कुणाची वर्णी लागले, हे लवकरच स्पष्ट होईल. एकीकडे महापौर निवडीच्या प्रक्रियेला सुरूवात झाली असतानाच, या नव्या महापौरासह पदाधिकाऱ्यांच्या स्वागताची तयारी पालिका प्रशासनाकडून सुरू केली आहे. त्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून प्रशासकीय राजवटीमुळे बंदिस्त असलेली महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, विशेष समित्या, प्रभाग समित्या आणि पक्ष कार्यालयांची साफसफाई पालिका प्रशासनाने सुरू केली आहे. या कार्यालयातील खुर्च्यांवर बसलेली धुळ झटकण्यात येत आहे.
ठाणे महापौर खुर्ची सफाई
ठाणे महापालिका मुख्यालय इमारतीच्या पहिल्या मजल्यावर महापौरांचे कार्यालय आहे. या कार्यालयात महापौरांसाठी ठेवण्यात आलेल्या खुर्ची झाकून ठेवण्यात आलेली होती. त्या खुर्चीवरील आवरण काढून ती साफसफाई करून ठेवण्यात आली आहे. शिवाय, कार्यालयाची स्वच्छता करण्यात येत आहे. याशिवाय, पालिकेच्या सर्वसाधरण सभेसाठी दुसऱ्या मजल्यावर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह असून तिथेही साफसफाई करण्यास सुरूवात झाली आहे.
