ठाणे : सण-उत्सवांच्या काळात ध्वनिक्षेपकांचा मोठ्या आवाजात वापर तसेच फटाक्यांच्या अतिवापरामुळे होणारे ध्वनी आणि पर्यावरण प्रदूषण रोखण्यासाठी ठाणे महापालिकेने स्वतंत्र यंत्रणा उभारली आहे. नागरिकांना या संदर्भातील तक्रारी नोंदविता याव्यात, यासाठी प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचा दूरध्वनी क्रमांक आणि प्रभाग समितीनिहाय स्वतंत्र ई-मेल सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सण-उत्सवांच्या काळात विविध ठिकाणी ध्वनिक्षेपकांचा मोठ्या आवाजात वापर केला जातो. त्यामुळे ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारी वाढतात. तसेच, सार्वजनिक ठिकाणी फटाक्यांचा अतिवापर केल्याने ध्वनी आणि पर्यावरण प्रदूषणाची समस्या निर्माण होते. याचा सर्वाधिक त्रास ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि रुग्णांना सहन करावा लागतो.
या पार्श्वभूमीवर नागरिकांना त्यांच्या परिसरातील ध्वनी आणि पर्यावरण प्रदूषणासंदर्भातील तक्रारी सहजपणे नोंदविता याव्यात आणि त्यावर तातडीने कार्यवाही करता यावी, यासाठी महापालिकेने ही सुविधा सुरू केली आहे. नागरिकांना प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षातील तक्रार निवारण यंत्रणेशी संपर्क साधण्यासाठी ८६५७८८७१०२ हा दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. याशिवाय, संबंधित प्रभाग समितीच्या हद्दीतील तक्रारी नोंदविण्यासाठी स्वतंत्र ई-मेल पत्ते निश्चित करण्यात आले आहेत.
प्रभाग समितीनिहाय तक्रारींसाठी ई-मेल पत्ते
१. माजिवडा-मानपाडा – amcmaj@thanecity.gov.in २. उथळसर – amcjog@thanecity.gov.in ३. वर्तकनगर – amcvar@thanecity.gov.in ४. वागळे – amcwag@thanecity.gov.in ५. लोकमान्य-सावरकर – amclok@thanecity.gov.in ६. कळवा – amckal@thanecity.gov.in ७. मुंब्रा – amcmum@thanecity.gov.in ८. दिवा – amcdiva@thanecity.gov.in ९. नौपाडा – amcnau@thanecity.gov.in तक्रारींसाठी संपर्क क्रमांक : ८६५७८८७१०२
