ठाणे : सुपर एल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे आगामी काळात पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन ठाणे महापालिकेने पाणीबचतीसाठी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी) कार्यरत असूनही प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करीत नसलेल्या सोसायट्यांना नोटिसा बजावण्यात येणार आहेत. त्यानंतरही नियमांचे पालन केले नाहीतर संबंधित सोसायट्यांचा महापालिकेचा पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

सुपर अल निनोमुळे पर्जन्यमानात घट होऊन उपलब्ध जलसाठ्यावर ताण निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या कै. अरविंद पेंडसे सभागृहात नगर अभियंता सुरेंद्रकुमार काटकर यांनी बैठक घेऊन पाणीपुरवठा व्यवस्थेचा आढावा घेतला. या बैठकीत पाण्याची बचत, पुनर्वापर व वितरणातील गळती रोखण्याबाबत विविध विभागांना सूचना देण्यात आल्या.

सोसायट्यांमध्ये सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी) कार्यान्वित असूनही प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर केला जात नसल्याचे आढळल्यास संबंधित सोसायट्यांना नोटिसा बजावण्यात येणार आहेत. त्यानंतरही प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर केला नाहीतर दंडात्मक कारवाई करून अखेर सोसायटीचा महापालिकेचा पाणीपुरवठा बंद करण्याचे निर्देश नगर अभियंता सुरेंद्रकुमार काटकर यांनी दिले आहेत.

त्यामुळे एसटीपी यंत्रणा असूनही तिचा वापर टाळणाऱ्या सोसायट्यांची आता महापालिका प्रशासनाकडून तपासणी होणार आहे. दरम्यान, शासनाच्या निर्देशानुसार उपलब्ध जलसाठा ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पुरेल, या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी पाण्याचा अनावश्यक वापर टाळावा, गळणारे नळ तातडीने दुरुस्त करावेत व पाण्याचा पुनर्वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.

एसटीपी असूनही वापर नाही, तर नळ बंद

शहरातील अनेक गृहनिर्माण संस्थांमध्ये सांडपाणी प्रक्रिया केंद्रे कार्यान्वित आहेत. मात्र, त्यातून प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर केला जात नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा सोसायट्यांना नोटिसा बजावून प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर बंधनकारक करण्यात येणार आहे. नोटीस व दंडात्मक कारवाईनंतरही नियमांचे पालन केले नाहीतर संबंधित सोसायटीचा पाणीपुरवठा बंद करण्याची कारवाईचे निर्देश काटकर यांनी दिले आहेत. तसेच शौचालयांच्या वापरासाठी बोअरवेलच्या पाण्याचा वापर करण्याच्या सुचना त्यांनी केल्या आहेत.

उद्यानांना पिण्याचे पाणी बंद

महापालिका व खासगी उद्याने तसेच मैदानांच्या देखभालीसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर टाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याऐवजी प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा वापर करावा लागणार आहे. यासाठी टँकर खरेदी करणे वा भाडेतत्त्वावर उपलब्ध करून घेण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. बांधकाम व्यावसायिकांनाही प्रक्रिया केलेले पाणी उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे. गळती व अनधिकृत जोडण्यांवर कारवाई शहरातील मुख्य जलवाहिन्या, वितरण वाहिन्या, जलकुंभ व पंप हाऊसचे सर्वेक्षण करून पाणीगळती शोधण्यासाठी विशेष पथके नियुक्त केली जाणार आहेत. गळती आढळल्यास तातडीने दुरुस्ती करण्यात येईल. तसेच अनधिकृत नळजोडण्यांचे सर्वेक्षण करून त्या खंडित करण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे. अनधिकृत जोडण्या नियमित करण्यासाठी विशेष शिबिरेही आयोजित केली जातील.

टँकरवर जीपीएसची नजर

पाणीटंचाई वा आपत्कालीन स्थितीत महापालिका व खासगी टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जाईल. टँकरचे दर, फेऱ्या व वितरणावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्व टँकरना जीपीएस यंत्रणा बसवून त्यांच्या हालचालींवर ऑनलाइन लक्ष ठेवण्यात येणार आहे. तसेच जलशुद्धीकरण केंद्रापासून जलकुंभापर्यंत व तेथून विभागनिहाय होणाऱ्या पाणीवितरणाचे लेखापरीक्षण करण्यात येणार आहे. कमी दाबाने वा अपुरा पाणीपुरवठा होणाऱ्या भागांतील तांत्रिक त्रुटी दूर केल्या जातील.