आधीचे देयक भरणाऱ्यांनाही थकबाकीसह नव्याने बिले; बिल भरल्याची पावती नसल्यास थकबाकी भरण्याची सक्ती

नीलेश पानमंद, ठाणे</strong>

ठाणे महापालिकेकडून होणाऱ्या पाणीपुरवठय़ाच्या गतवर्षीच्या देयकानुसार रक्कम जमा करणाऱ्या शेकडो कुटुंबांना या वर्षी थकबाकीसह पुन्हा बिले पाठवण्यात आली आहेत. त्यामुळे बिल दुरुस्तीसाठी नागरिकांना महापालिकेच्या विभाग कार्यालयांमध्ये खेटे घालावे लागत आहेत. त्यातही बिलांत दुरुस्ती करण्यासाठी गेल्या तीन वर्षांच्या पाणी बिल भरलेल्या पावत्या सोबत आणण्याची सूचना प्रशासनाकडून केली जात आहे. अनेक नागरिकांकडे जुन्या पावत्या उपलब्ध नसल्याने त्यांना थकबाकीसह रक्कम भरण्यास सांगितले जात आहे.

ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून शहरातील नागरिकांना गेल्या वर्षीपासून चुकीची बिले पाठविली जात आहेत. पाणी बिले भरलेली असतानाही बिलांमध्ये थकबाकीची रक्कम दाखविली जात असून या प्रकारामुळे पाणीपुरवठा विभाग टिकेचा धनी ठरू लागला आहे. त्यामुळे पाणी बिलांमधील त्रुटी दूर करण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने गेल्या महिन्यात विशेष मोहीम राबविली. त्यानंतरही शहरातील नागरिकांच्या पाणी बिलांमधील त्रुटी अजूनही दूर झालेल्या नसल्याची बाब समोर आली आहे. महापालिका पाणीपुरवठा विभागाने शहरातील नागरिकांना यंदाच्या वर्षांची पाणी बिले पाठविली असून त्यापैकी अनेक बिलांमध्ये मागील थकबाकीची रक्कम दाखविली आहे. गेल्या वर्षी वेळेत पाणी बिले भरणाऱ्या नागरिकांच्या बिलांमध्ये अशा प्रकारची थकबाकी दाखविण्यात आली आहे. घोडबंदर भागातील अनेक गृहसंकुलातील नागरिकांना अशा प्रकारची चुकीची बिले पाठविण्यात आली असून यामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत.

बिलामध्ये दुरुस्ती करण्यासाठी गेल्या तीन वर्षांची पाणी बिले भरलेल्या पावत्या सोबत घेऊन येण्याच्या सूचना प्रशासनाने या बिलांद्वारे केल्या आहेत. नागरिक पाणी बिलांचा भरणा करतात त्याची नोंद महापालिकेकडे होते. या नोंदी तपासून महापालिका बिलांमध्ये दुरुस्ती करू शकते. मात्र तरीही तीन वर्षांची बिले दाखविण्याची सक्ती कशासाठी, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे. मात्र महापालिकेकडे यासंबंधीच्या नोंदीच उपलब्ध नसल्यामुळे हा गोंधळ सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

महापालिकेने पाणी बिले तयार करण्याचे काम काही वर्षांपूर्वी एका खासगी कंपनीला दिले होते. काही कारणास्त्व कंपनीचा ठेका रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. त्यानंतर या कंपनीने संगणकातील बिघाडामुळे पाणी बिलांसंबंधीची माहिती नष्ट झाल्याने ही वेळ ओढवल्याचेही सूत्रांनी सांगितले. मात्र पालिकेच्या या गोंधळाचा भुर्दंड नागरिकांना सोसावा लागत आहे.

कारवाईचा इशारा

पाणी बिलाची रक्कम दिलेल्या तारखेला भरले नाही तर त्यावर प्रतिमहा एक टक्का विलंब शुल्क आकारण्यात येणार असल्याची सूचना प्रशासनाने बिलांवर नमूद केली आहे. याशिवाय, बिल मुदतीत भरले नाही तर नळजोडण्या खंडित करून थकीत रक्कम वसूल करण्यासाठी अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचे बिलावर नमूद केले आहे. तसेच पाणी बिलांमध्ये थकबाकी दर्शविलेली असल्यास किंवा थकबाकी असतानाही दर्शविली गेली नसल्यास या बिलांमध्ये दुरुस्ती करण्यात येईल. हे दुरुस्त केलेले बिल ग्राहकांना स्वीकारणे बंधनकारक राहील असेही बिलामध्ये म्हटले आहे.

अधिकारी ‘संपर्क’हीन

या बिलांमधील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी अधिकाऱ्यांचे मोबाइल क्रमांक दिले आहेत. मात्र हे अधिकारी फोनच घेत नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. या संदर्भात महापालिका पाणीपुरवठा विभागाचे उपनगर अभियंता अर्जुन अहिरे यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.