ठाणे : मालमत्ताकराच्या पावतीमधील नावात बदल केलेले प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी ठाणे महापालिकेच्या वागळे इस्टेट प्रभाग समितीतील मालमत्ता कर वसुली विभागातील शिपाईला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महापालिकेच्या कार्यालयातच अडीच हजार रुपयांची लाच घेताना अटक केली. देवेंद्र कोळी (४३) असे अटकेत असलेल्या शिपायाचे नाव असून कारवाईमुळे ठाणे महापालिकेतील लाचखोरीचे प्रकार पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
तक्रारदार यांची भागीदारीमध्ये कंपनी आहे. त्यांनी वागळे इस्टेट भागात एक कार्यालय भाडेतत्त्वावर घेतले होते. त्या कार्यालयाच्या मालमत्ताकराच्या पावतीमधील नावात बदल केल्याच्या प्रमाणपत्राची तक्रारदार यांना गरज होती. तक्रारदार हे वागळे इस्टेट प्रभाग समितीच्या कार्यालयातील मालमत्ता कर वसुली विभागात गेले असता, देवेंद्र याने त्यांना दोन हजार रुपये शासकीय शुल्क आणि तीन हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती अडीच हजार रुपये देण्याचे ठरले. ४ सप्टेंबरला तक्रारदार यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात देवेंद्र यांनी तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे ७ सप्टेंबरला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून देवेंद्र कोळी याला लाच घेतना प्रभाग समितीच्या कार्यालयातून ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात
गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आल्याची माहिती ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक भारत जाधव यांनी दिली.
