ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवत शिंदेंच्या शिवसेनेने सत्ता स्थापन केली असली, तरी सत्तेच्या सुरुवातीपासूनच नगरसेवकांमध्ये एकवाक्यता नसल्याचे चित्र समोर येत आहे. या नगरसेवकांमध्ये एकमेकांना शह देण्याची चढाओढ सुरू असतानाच, दुसरीकडे भाजपचे आमदार आणि नगरसेवक आक्रमक पवित्रा घेत पालिका प्रशासनावर सातत्याने दबाव वाढवून आपली प्रशासकीय पकड मजबूत करताना दिसून येत आहे. विविध प्रलंबित प्रश्न, प्रकल्पांतील त्रुटी आणि स्थानिक मुद्द्यांवर भाजपचे आमदार आणि नगरसेवक सक्रिय झाल्याने, पालिकेत शिंदे सेनेची सत्ता पण, प्रभाव मात्र भाजपचा अशी चर्चा रंगली आहे.
ठाणे महापालिकेची निवडणुक नुकतीच पार पडली. ही निवडणूक शिंदेची शिवसेना आणि भाजपनेही युतीत लढविली असली तरी. शिंदेच्या शिवसेनेने १३१ पैकी ७५ जागांवर विजय मिळवला. स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी, युतीत निवडणुका लढविल्यामुळे शिंदे सेने भाजपला सोबत घेऊन सत्ता स्थापन केली. सत्तेत सामील झालो असलो तरी, पालिकेत चौकीदाराची भुमिका बजावणार असल्याचे भाजप आमदार संजय केळकर हे वारंवार सांगत आहेत. आमदार केळकर आणि निरंजन डावखरे हे दोघे एकत्रितपणे शहरातील प्रकल्पांना भेटी देऊन त्यातील त्रुटींवर बोट ठेवण्याबरोबरच प्रशासनाला फैलावर घेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही आमदार पालिका आयुक्त तसेच अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांना महत्वाच्या सुचना देत आहेत.
आमदार केळकर यांचा जनसेवकाचा जनसंवाद कार्यक्रम होत असून यात प्राप्त तक्रारी निकाली काढण्याच्या सुचना ते पालिका अधिकाऱ्यांना देत आहेत. ज्ञानेश्वरनगरमधील आरोग्य केंद्र जागेचा वाद, अंतर्गत मेट्रो प्रकल्पातील त्रुटी, कोपरी मलनिस्सारण प्रकल्पातून ठाणेकरांची होणारी लुट यासह अनेक मुद्दे दोन्ही आमदारांनी गेल्या काही दिवसांत मांडले आहेत. भाजपने आक्रमक आणि संघटित भूमिका घेत पालिका प्रशासनावर सातत्याने दबाव निर्माण केला आहे. विविध प्रलंबित प्रश्न, प्रकल्पांतील त्रुटी आणि स्थानिक मुद्द्यांवर भाजपचे आमदार आणि नगरसेवक सक्रिय झाल्याने, सत्तेत असूनही प्रभावी विरोधकाची भूमिका भाजप बजावत असल्याचे चित्र ठाण्यात दिसून येत आहे.
नगसेवकांमध्ये एकवाक्यता नाही
पालिकेच्या पहिल्याच सभेत भाजपने प्रशासकीय काळात शासनाकडून आलेल्या निधी आणि त्याच्या खर्चाची माहिती मागवून प्रशासनासह शिंदे सेनेचे कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता. याच कारणावरून पहिल्याच सभेत भाजप आणि शिंदे सेेनेच्या नगरसेवकांमध्ये शाब्दीक वादही झाले होते. दुसऱ्या सभेत नारीशक्ती वंदन विधेयकाच विरोध करणाऱ्यांच्या निषेधार्थ सभा तहकुब करण्याचा प्रस्ताव डावल्याने या दोन्ही पक्षाच्या नगरसेवकांमध्ये वाद झाले होते. पालिकेच्या सभेत भाजपचे नगरसेवक एकत्रितपणे मुद्दे मांडताना दिसून येतात. तर,सत्तेच्या सुरुवातीपासूनच शिंदे सेनेच्या नगरसेवकांमध्ये एकवाक्यता नसून त्यांच्यात एकमेकांना शह देण्याची चढाओढ दिसून येते. उपवन तलाव परिसरातील अतिक्रमणाबाबत आयुक्त, महापौरांच्या दालनात बैठका होऊनही कारवाई होत नसल्याचा मुद्दा नगरसेविका परिषा सरनाईक यांनी मांडला होता. यानंतर त्याठिकाणी कारवाई सुरू झाली असली तरी, पालिकेत शिंदे सेनेची प्रशासकीय पकड कमी होत असल्याचे दिसून येत आहे.
शहरविकासाच्या सुचनांसाठी बैठक
ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, आमदार संजय केळकर आणि आमदार निरंजन डावखरे यांची शहर विकासासंदर्भात नुकतीच महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत डावखरे यांनी ‘कलर म्युझियम’ प्रकल्पाचे सादरीकरण केले असून, तो शिक्षण आणि पर्यटनासाठी नवे आकर्षण ठरणार आहे. तसेच महानगरपालिका बाँड्सद्वारे निधी उभारणीचा पर्याय मांडण्यात आला. दरम्यान, कोपरी येथील ५ दशलक्षलीटर मलनिस्सारण प्रकल्प अपयशी ठरत असल्याची बाब समोर आली असून, त्यासाठी चौकशीची मागणीही केली. तसेच ऐरोली-कोपरखैरणे येथे डेटा सेंटर्स उभारणीवरही चर्चा झाली. एकूणच, ठाणे शहराच्या विकासाला गती देण्यासाठी विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर विचारमंथन करण्यात आले.
सेनेच्या गटनेत्यांचे म्हणणे
चार वर्षानंतर निवडणुका झाल्यामुळे प्रत्येक नगरसेवकाला आपल्या समस्या मांडायच्या असतात आणि यातुनच ते सभागृहात आपली मते व्यक्त करत आहेत. त्यामुळे एकवाक्यता दिसून येत नसावी. यंदा अर्थसंकल्पीय सभेतही नवीन नगरसेवकांनी चांगल्या सुचना केल्या. पालिकेच्या सभागृहात सेनेचे नगरसेवक, भाजपचे तसेच विरोधी पक्ष नेते शानू पठाण यांनी उपस्थित केलेल्या प्रकरणे महापौर शर्मिला पिंपळोलकर या स्वत: गांभीर्याने घेऊन त्यावर कार्यवाही करतात. कुठेही पक्ष पातीपणा नाही, शहराचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशातून काम करीत आहेत. भाजपचे दोन्ही आमदारांचा पालिकेत प्रभाव दिसून येत असला तरी, महापौर आणि पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक प्रशासनाची दोन दिवसाआड बैठका घेऊन कामांचा आढावा घेतला जात आहे. – पवन कदम, शिवसेना (शिंदे) गटनेता
भाजप काय म्हणते?
ठाणे पालिकेत आम्ही युतीत सत्तेवर असलो तरी, महापालिकेचा कारभार पारदर्शक पद्धतीने राबविता येईल, या दृष्टीने काम करत आहोत. दोन्ही आमदार आणि नगरसेवक हे ठाणेकरांच्या हितासाठी आम्ही सत्तेत असूनही चौकीदाराची भुमिका बजावत आहोत आणि यापुढेही बजावत राहणार आहोत. – सुनेश जोशी, भाजप नगरसेवक
