ठाणे – नव्या आर्थिक वर्षात ठाणे महापालिकेच्या तिजोरीत मालमत्ता कराचा अधिकाधिक भारणा व्हावा या उद्देशातून प्रशासनाने १ एप्रिलच्या पहाटेच ठाणेकरांना मोबाईलवर एसएमएसद्वारे देयके आणि ऑनलाइन भरण्याची लिंक पाठवून कर भरण्याचे आवाहन केले. त्यास प्रतिसाद देत गेल्या दोन दिवसांत ५४३५ ठाणेकरांनी पालिकेच्या तिजोरीत ५ कोटी २७ लाखांचा महसुल जमा केला. तर, कर भरण्याची इच्छा असूनही काही बँकांच्या तांत्रिक अडचणींमुळे कर भरणे शक्य झाले नसल्याच्या तक्रारी काही नागरिकांनी केल्या.
ठाणे महापालिकेचा मालमत्ता कर हा पालिकेच्या उत्पन्नाचा महत्वाचा स्रोत मानला जातो. गेल्या म्हणजेच २०२५-२६ या आर्थिक वर्षात महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने ठरवून दिलेल्या ९१५ कोटींच्या उद्दीष्टापैकी ८७८ कोटी रुपयांचा कर वसुल केला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा ६८ कोटी ३७ लाखांचा अधिक महसूल पालिकेला प्राप्त झाला आहे. सुमारे ८७.३७ टक्के कर हा डिजिटल आणि इतर आधुनिक माध्यमातून भरला गेल्याने ठाणेकरांनी ऑनलाईन भरणा पद्धतीला स्पष्ट पसंती दिली आहे. यंदा पालिकेने मालमत्ता कर विभागाला १२०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट दिले आहे. त्यासाठी ई-बिलिंग, व्हॉट्सॲप चॅटबॉट आणि पहिल्याच दिवशी देयके पाठवण्याची व्यवस्था राबवण्यात आली आहे.
याशिवाय, महापालिकेकडून १ एप्रिलच्या पहाटे ठाणेकरांना मोबाईलवर एसएमएसद्वारे देयके आणि ऑनलाइन भरण्याची लिंक पाठवून कर भरण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यास प्रतिसाद देऊन पहिल्याच दिवशी म्हणजे १ एप्रिलला दिवसभरात १८८४ नागरिकांनी १ कोटी ६७ लाखांचा कर पालिकेच्या तिजोरीत जमा केला. तर, दुसऱ्या दिवशी म्हणजेच, २ एप्रिल रोजी दुपारी दिड वाजेपर्यंत ३५५१ नागरिकांनी ३ कोटी ६० लाखांचा कर पालिकेच्या तिजोरीत जमा केला. असा एकूण गेल्या दोन दिवसांत ५४३५ ठाणेकरांनी पालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन पालिकेच्या तिजोरीत ५ कोटी २७ लाखांचा महसुल जमा केला.
गेल्यावर्षीही पालिकेने १ एप्रिलच्या पहाटे ठाणेकरांना मोबाईलवर एसएमएसद्वारे देयके आणि ऑनलाइन भरण्याची लिंक पाठवून कर भरण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यास प्रतिसाद देत ठाणेकरांनी पहिल्याच दिवशी १ कोटी ६० लाखांचा कर पालिकेकडे जमा केला होता. तर, एप्रिल महिन्यात ६२ कोटींचा कर जमा झाला होता. यंदाच्या वर्षी पहिल्याच दिवशी १ कोटी ६७ लाखांचा कर पालिकेच्या तिजोरीत जमा झाला असून गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
एसएमएस आला… पण लिंकच बंद!
मालमत्ता करावरी व्याज टाळण्यासाठी अनेक नागरिक पहिल्याच दिवशी कर भरतात. महापालिकेकडून १ एप्रिलच्या पहाटे ठाणेकरांना मोबाईलवर एसएमएसद्वारे देयके आणि ऑनलाइन भरण्याची लिंक पाठवण्यात आली, पण ही लिंकच उघडत नसल्याने अनेकांना कर भरता आला नाही, अशा तक्रारी पुढे आल्या आहेत. कर भरण्याची इच्छा असूनही तांत्रिक अडचणींमुळे ठाणेकरांचा पहिल्याच दिवशी हिरमोड झाल्याचे चित्र समोर आले.
गेल्या दोन दिवसांत ५४३५ ठाणेकरांनी पालिकेच्या तिजोरीत ५ कोटी २७ लाखांचा महसुल जमा केला. तर, पालिकेने एसएमएसद्वारे पाठविलेल्या लिंकमध्ये कोणतीही तांत्रिक अडचण नव्हती. त्यामुळेच इतका कर जमा होऊ शकला आहे. काही बँकांच्या तांत्रिक अडचणींमुळे कर भरणे शक्य होत नव्हते, ही वस्तुस्थिती आहे. कर भरण्यासाठी ई-बिलिंग, व्हॉट्सॲप चॅटबॉट आणि देयके पाठवण्याची व्यवस्था राबवण्यात येत आहे. – जी. जी. गोदेपुरे, उपायुक्त, ठाणे महापालिका
