ठाणे : आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी ठाणे महापालिकेने प्रस्तावित केलेल्या मालमत्ता कर आणि मालमत्ता हस्तांतरण शुल्क दरवाढ हे दोन्ही प्रस्ताव सोमवारी चर्चेविनाच पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुर करण्यात आले. यामुळे ठाणेकरांच्या खिशावर दुहेरी कर वाढीचा भार पडणार आहे. मात्र, ठाणे परिवहनच्या तिकीट दरवाढीचा प्रस्ताव मागे घेण्यात आल्याने टीएमटी प्रवाशांना तूर्तास दिलासा मिळाला आहे. नव्या प्रस्तावानुसार निवासी मालमत्ता करात १२ टक्के, तर बिगर निवासी मालमत्ता करात २० टक्के वाढ होणार आहे.

या करवाढीतून महापालिकेला वर्षाला सुमारे १०४ कोटी ६७ लाख रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळणार असल्याचा प्रशासनाचा दावा आहे. महापालिकेने २०१८-१९ नंतर मालमत्ता कराच्या दरात वाढ केलेली नाही. वाढते नागरिकीकरण आणि नागरी सेवा-सुविधांसाठी वाढीव निधीची गरज असल्याचे कारण देत प्रशासनाने करवाढ प्रस्तावित केली होती. तर, मालमत्ता खरेदी-विक्री, बक्षीसपत्र किंवा वारसाहक्काने मालकी बदलल्यानंतर मालमत्ता कराचे दायित्व नवीन मालकाच्या नावावर करण्यासाठी आकारण्यात येणाऱ्या हस्तांतरण शुल्कही वाढविण्याचे प्रशासनाने प्रस्तावित केले होते.

सध्या क्षेत्रफळानुसार ठरावीक शुल्क आकारले जाते. नव्या प्रस्तावानुसार मालमत्तेच्या बाजारमूल्याच्या ०.५ टक्के शुल्क आकारण्याचे प्रस्तावित होते. हे दोन्ही प्रस्ताव सोमवारी झालेल्या सर्व साधारण सभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. या विषयांवर चर्चा होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, कोणत्याही चर्चेविनाच हे दोन्ही प्रस्ताव मंजुर करण्यात आले. हस्तांतरण शुल्क वाढले ठाणे महापालिका क्षेत्रातील मालमत्ता हस्तांतरण शुल्कातही वाढ करण्याच्या प्रस्तावास सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली.

क्षेत्रफळाऐवजी बाजारमूल्याच्या ०.५ टक्के दराने शुल्क आकारण्यात येणार असल्याने एक कोटी रुपयांची मालमत्ता खरेदी केल्यास त्यावर ०.५ टक्क्यानुसार ५० हजार रुपये हस्तांतरण शुल्क पालिकेला भरावे लागणार आहे. यापुर्वी पाचशे ते १००१ हून अधिक चौरसफुटांच्या मालमत्तेसाठी १ हजार ते १० हजार रुपये इतके शुल्क भरावे लागत होते. तसेच, अनधिकृत मालमत्ता आणि वारसा हक्क मालमत्ता हस्तांतरण शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. टीएमटी प्रवाशांना दिलासा आर्थिक अडचणीत सापडलेल्या ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाने (टीएमटी) आता ११ वर्षानंतर प्रवासी तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला होता.

यानुसार, सर्वसाधारण बसच्या तिकीट दरात ३ ते २५ रुपये तर, वातानुकूलित बसच्या तिकीट दरात ३ ते ७ रुपयांनी वाढ करण्याचे प्रस्तावित केले होते. या दरवाढीतून दररोज सुमारे ९ लाख ३० हजार रुपये आणि वर्षाला सुमारे ३३ कोटी ४८ लाख रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळेल, असा दावा प्रशासनाने केला होता. सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत ठाणे परिवहनच्या तिकीट दरवाढीचा प्रस्ताव मात्र मागे घेण्यात आला आहे. मुंबई महानगरातील शहरांमधील परिवहन सेवेचे तिकीट दर समान असावेत असे धोरण राज्य शासनाकडून आखले जात आहेत. त्यामुळे हा प्रस्ताव मागे घेत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. या निर्णयामुळे टीएमटीने प्रवास करणाऱ्या ठाणेकरांना सध्या तरी वाढीव तिकीट दराचा भार सहन करावा लागणार नाही.