ठाणे : ठाणे महापालिकेने थकीत मालमत्ता कराच्या वसुलीसाठी कारवाई सुरू केली असून, ६ हजार ५८० मालमत्ताधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तर २८६ मालमत्तांवर वॉरंट बजावून जप्तीची कारवाई करण्यात आली असून, ७३ मालमत्तांचा पाणीपुरवठा खंडित आणि १२६ मालमत्तांना टाळे लावण्यात आले आहे.
ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार मालमत्ता कर विभागाने थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी कठोर पावले उचलली असून, थकबाकीदार करदात्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. २०२६-२७ या आर्थिक वर्षातील मालमत्ता कराची देयके वितरित केल्यानंतर अनेक करदात्यांनी कराचा भरणा केला असला, तरी अद्याप काही मालमत्ताधारकांनी थकीत कर जमा केलेला नसल्याचे निदर्शनास आले आहे.
अधिनियमानुसार थकीत कर कारवाईस पात्र ठरलेल्या थकबाकीदारांविरोधात महापालिकेमार्फत वसुलीची मोहीम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत आतापर्यंत ६ हजार ५८० मालमत्ताधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, २८६ मालमत्तांवर वॉरंट बजावून जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. तसेच, ७३ मालमत्तांचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला असून, १२६ मालमत्तांना टाळे लावण्यात आले आहे.
मालमत्ता कराची वसुली प्रभावीपणे करण्याच्या दृष्टीने ही कारवाई अधिक कडक करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. त्यानुसार प्रभागनिहाय सहायक आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली पथके तयार करून थकबाकीदारांविरोधात कारवाई सुरू करण्यात आली आहे. मालमत्ता कर वसुलीच्या कारवाईदरम्यान अप्रिय घटना टाळण्यासाठी, ज्या करदात्यांनी अद्याप थकीत कर भरलेला नाही, त्यांनी आपला देय कर तातडीने महापालिकेकडे जमा करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
नागरिकांना आवाहन
मालमत्ताधारकांना कराचा भरणा करणे सुलभ व्हावे, यासाठी महापालिकेने ऑनलाइन कर भरण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. महापालिकेच्या संकेतस्थळासह गुगल पे, फोन पे, पेटीएम, भीम ॲप, क्यूआर कोड आणि व्हॉट्सॲप चॅटबॉटच्या माध्यमातून कर भरता येतो. थकीत मालमत्ता कराचा भरणा करून ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.
