ठाणे : ठाणे महापालिकेला साडे सहा लाखांच्या आसपास मालमत्तांना कर आकारत असून त्यापैकी सुमारे एक लाख मालमत्ता करधारकांनी पालिकेचा मालमत्ता कर भरला नसल्याची बाब पुढे आली आहे. अशा मालमत्ता करधारकांविरोधात पालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला असून त्यांच्या मालमत्ता जप्त करण्याची कारवाई करण्यात येत आहे. तसेच, थकबाकीदारांची नावे नावे प्रसारमाध्यमांतून प्रसिद्ध करण्याचे निर्देश आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.
ठाणे महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत म्हणून मालमत्ता कर ओळखला जातो. ठाणे महापालिका दरवर्षी नवीन मालमत्तांची तपासणी करून त्यांना कर आकारणी सुरू करते. पालिकेकडे साडे सहा लाखांच्या आसपास मालमत्तांची नोंद असून त्यांना पालिका कर आकारणी करते. यंदाच्या अर्थसंकल्पात पालिकेच्या मालत्ता कर विभागाला ९०० कोटी रुपयांचा कर वसुलीचे उद्दीष्ट ठरवून देण्यात आले होते. पैकी ६३० कोटी रुपयांचा कर वसुल करण्यात पालिकेला यश आलेले आहे. मार्च अखेरपर्यंत म्हणजे, मार्च अखेरपर्यंत २७० कोटी रुपयांचा कर पालिकेला वसुल करायचा असून त्यासाठी पालिका प्रशासनाने पाऊले उचलली आहेत.
पालिकेकडे कर आकारणी करण्यात येत असलेल्या साडे सहा लाखांपैकी एक लाख १० हजारांच्या आसपास मालमत्ताधारकांनी कर अद्याप भरलेला नसल्याची माहिती पुढे आली आहे. यामुळे महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने थकबाकीदारांविरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे. अनेक करदात्यांनी वेळेत मालमत्ता कर भरून महापालिकेला सहकार्य केले असले तरी काही करदाते अद्याप थकबाकीदारआहेत. थकबाकीदारांवरील कारवाई अधिक कठोर आणि प्रभावी करण्याचे तसेच त्यांची नावे प्रसारमाध्यमांतून प्रसिद्ध करण्याचे निर्देश आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.
थकबाकीदारांवर कारवाई
यंदाच्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरु असल्याने मालमत्ता करवसुलीची कारवाई महापालिकेकडून हाती घेण्यात आली आहे. याअंतर्गत थकीत करदात्यांना नोटीस, वॉरंट बजावून मिळकत जप्त करणे, जाहिर लिलावाद्वारे मालमत्तांची विक्री करणे तसेच मालमत्ता सील करणे अशी कारवाई हाती घेण्यात आली आहे. अद्यापपर्यंत ५१३ मालमत्ता जप्त केल्या असून, २२३ मालमत्ता सील करण्यात आल्या. तसेच १२०६ थकबाकीदारांचा पाणीपुरवठा खंडीत करण्यात आला आहे.
कर भरण्याचे आवाहन
करदात्यांना सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे यासाठी सर्व प्रभाग स्तरावरील संकलन केंद्रे ३१ मार्चपर्यंत सर्व शनिवारी सकाळी १०.३० ते सायंकाळी ४.३० तसेच सर्व रविवार सकाळी १०.३० ते दुपारी १.३० या वेळेत कर संकलनाकरीता कार्यान्वीत ठेवण्यात आले आहेत. करदाते महापालिकेच्या २१ संकलन केंद्रापैकी कोणत्याही संकलन केंद्रावर त्यांचा मालमत्ता कर जमा करु शकतात. त्याचप्रमाणे करदाते http://www.propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसेच GooglePay, Phonepe, Bhim App च्या माध्यमातून ऑनलाईन पध्दतीने मालमत्ता कर भरु शकतात. करदात्यांनी आपला थकीत मालमत्ता कर भरुन महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
