ठाणे : यंदाच्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी मालमत्ता कर वसुलीला गती देण्यासाठी पालिकेने पाऊले उचलली. महापालिकेकडून १ एप्रिलच्या पहाटे ठाणेकरांना मोबाईलवर एसएमएसद्वारे देयके आणि ऑनलाइन भरण्याची लिंक पाठवण्यात आली, पण ही लिंकच उघडत नसल्याने अनेकांना कर भरता आला नाही. कर भरण्याची इच्छा असूनही तांत्रिक अडचणींमुळे ठाणेकरांचा पहिल्याच दिवशी हिरमोड झाल्याचे चित्र समोर आले.
ठाणे महापालिकेचा मालमत्ता कर हा पालिकेच्या उत्पन्नाचा महत्वाचा स्रोत मानला जातो. गेल्या म्हणजेच २०२५-२६ या आर्थिक वर्षात महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने ठरवून दिलेल्या ९१५ कोटींच्या उद्दीष्टापैकी ८७८ कोटी रुपयांचा कर वसुल केला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा ६८ कोटी ३७ लाखांचा अधिक महसूल पालिकेला प्राप्त झाला आहे. सुमारे ८७.३७ टक्के कर हा डिजिटल आणि इतर आधुनिक माध्यमातून भरला गेल्याने ठाणेकरांनी ऑनलाईन भरणा पद्धतीला स्पष्ट पसंती दिली आहे. यंदा पालिकेने मालमत्ता कर विभागाला १२०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट दिले आहे. त्यासाठी ई-बिलिंग, व्हॉट्सअॅप चॅटबॉट आणि पहिल्याच दिवशी देयके पाठवण्याची व्यवस्था राबवण्यात आली. मात्र, या सर्व योजनेवर पहिल्याच दिवशी पाणी फिरल्याचे दिसून आले.
मालमत्ता कर वसुलीसाठी पालिकेकडून गेल्या काही वर्षांपासून विविध उपाययोजना करीत आहे. त्याचप्रमाणे यंदाही १ एप्रिल रोजी पहाटे वाजेपर्यत संगणकीय देयके तयार करून करदात्यांना याच दिवशी पहाटे एसएमएसद्वारे ही देयके मिळतील अशी व्यवस्था केली जाईल, अशी घोषणा पालिकेने अर्थसंकल्पात केली होती. अभिजीत बांगर यांच्याकडे आयुक्तपद असताना त्यांनी ही व्यवस्था उभी केली होती. या माध्यमातून पहिल्याच दिवशी काही कोटी रुपये जमा झाल्याचा डंकाही महापालिकेने पिटला. हीच व्यवस्था यंदाही पुर्ववत ठेवण्याचा जुनाच संकल्प यंदाच्या अर्थसंकल्पात नव्याने सोडण्यात आला होता. यंदा मालमत्ता कराच्या वसुलीसाठी व्हाॅटॲप चॅटबोट कर प्रणालीचा अवलंब केला जाईल. यामुळे दोन टप्प्यात कराचे देयके भरणे शक्य होणार असून करदात्यांना कराचे देयक आणि पावती मिळणे शक्य होणार आहे. तसेच ई बिलींगची संकल्पना यंदा अधिक प्रभावीपणे राबविण्यात येईल, अशीही घोषणा करण्यात आली होती.
यंदाच्या आर्थिक वर्षातही पहिल्या सहामहीप्रमाणे दुसऱ्या सहामहीचा कर भरणाऱ्या करदात्यांना सवलत सुट असणार आहे, असे पालिकेने जाहीर केले होते. ही सवलत मिळविण्यासाठी अनेक नागरिक पहिल्याच दिवशी कर भरतात. महापालिकेकडून १ एप्रिलच्या पहाटे ठाणेकरांना मोबाईलवर एसएमएसद्वारे देयके आणि ऑनलाइन भरण्याची लिंक पाठवण्यात आली, पण ही लिंकच उघडत नसल्याने अनेकांना कर भरता आला नाही, अशा तक्रारी पुढे आल्या आहेत. कर भरण्याची इच्छा असूनही तांत्रिक अडचणींमुळे ठाणेकरांचा पहिल्याच दिवशी हिरमोड झाल्याचे चित्र समोर आले.
