उर्वरित केंद्रांसाठी भाड्याने जागा घेण्याकरीता पालिकेने काढली निविदा
ठाणे : केंद्र सरकारच्या पंधराव्या वित्त आयोगांतर्गत नागरी आयुषमान आरोग्यमंदिर उभारणीच्या योजनेतून ठाणे महापालिकेला ४८ पैकी ६ केंद्र आतापर्यंत उभारणे शक्य झाले असून आणखी ८ केंद्रांसाठी पालिकेने जागाही निश्चित केल्या आहेत. परंतु उर्वरित ३४ केंद्रांसाठी जागा मिळत नसल्यामुळे ठाणे महापालिकेने अखेर या केंद्रांसाठी जागा भाड्याने घेण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावानुसार जागा भाड्याने घेण्यासाठी पालिकेने अभिव्यक्ती स्वारस्य देकार पद्धतीने निविदा प्रसिद्ध केली असून त्यात किती प्रतिसाद मिळतो, हे येत्या काळातच स्पष्ट होईल.
घराजवळील परिसरातच नागरिकांना मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशातून केंद्र आणि राज्य सरकारकडून आपला दवाखान्यांच्या धर्तीवर नागरी आयुषमान आरोग्य योजना राबविण्यात येत आहे. केंद्र सरकार पंधराव्या वित्त आयोगांतर्गत ही योजना राबवित असून यात या केंद्राच्या उभारणीपासून ते डाॅक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा खर्च राज्य सरकार करणार आहे. या योजनेंतर्गत ठाणे महापालिकेला एकूण ६८ नागरी आरोग्यमंदिरे उभारणीचे उद्दीष्ट देण्यात आले होते. परंतु या केंद्रांच्या उभारणीसाठी जागा उपलब्ध होत नसल्यामुळे तसेच शहरात आपला दवाखाने सुरू असल्यामुळे ६८ पैकी २० आरोग्यमंदिरे रद्द करण्यात आली होती. यामुळे पालिकेला एकूण ४८ आरोग्यमंदिरे उभारणीची उद्दीष्ट असून त्यासाठी पालिकेने १४ ठिकाणच्या जागा निश्चित केल्या आहेत. या जागा ठाणे महापालिकेच्या मालकीच्या आहेत. त्यातील सहा ठिकाणी आरोग्यमंदिरे पालिकेने सुरू केली आहेत. उर्वरित सहा ठिकाणी आरोग्यमंदिरे उभारणीची कामे सुरू आहेत. असे असले तरी उर्वरित ३४ आरोग्यमंदिरांसाठी पालिकेला जागाच मिळत नसल्याचे चित्र असून यामुळे पालिकेेने आता या केंद्रांसाठी जागा भाड्याने घेण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. या संदर्भात ठाणे महापालिकेच्या मुख्य आरोग्य अधिकारी डॉ.चेतना नितील के यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या वृत्तास दुजोरा दिला.
याठिकाणी हवे पालिकेला जागा माजिवाडा-मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रात वाघबीळ गाव, जुना गाव आनंदनगर, राम मारुती नगर, इंदिरापाडा, गायमुख, कापुरबावडी नाका, अशोकनगर, डोंगरीपाडा, कृष्णनगर, दिवा प्रभाग समिती क्षेत्रात खान कंपाऊंड (शिळफाटा), राशीद कंपाऊड कौसा, बी. आर.नगर, डवले, लोकमान्य-सावकरनगर प्रभाग समिती क्षेत्रात दुर्गा टेकडी, उथळसर प्रभाग समिती क्षेत्रात आझादनगर नंबर १ आणि २, वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रात जुना म्हाडा, भिमनगर, वागळे इस्टेट प्रभाग समिती क्षेत्रात वारली पाडा, मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रात घासवाला कंपाऊंड, इन्शानगर, नशेमन काॅलनी-मलिक हाईट, तेतवली कौसा-मुंब्रा, शिमला पार्क, आंबेडकरनगर, बाॅम्बे काॅलनी, जीवन बाग, कळवा प्रभाग समिती क्षेत्रात भास्करनगर, शांतीनगर, वाघोबानगर, महात्मा फुलेनगर (खारेगाव), राणानगर रेतीबंदर, शिवाजीनगर (कळवा), नौपाडा प्रभाग समिती क्षेत्रात धर्मवीरनगर, विष्णूनगर अशा ३४ ठिकाणी आरोग्यमंदिरे उभारणीसाठी पालिका भाड्याने जागा घेणार आहे.