ठाणे : वृक्ष छाटणी आणि धोकादायक झाडांचे व्यवस्थापन हे उद्यान विभागाचे काम असताना ठाणे महापालिका प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंते आणि उपअभियंत्यांवर ही जबाबदारी टाकण्याचा अजब निर्णय घेतला आहे. शहरातील रस्ते, पूल, इमारती आणि विकास प्रकल्पांची जबाबदारी सांभाळणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या खांद्यावर आता झाडांची जबाबदारीही टाकण्यात आली असून उद्यान विभाग आणि वृक्षप्राधिकरण अस्तित्वात असतानाही हा निर्णय घेतल्याने ठाणे महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसादरम्यान शेकडो झाडे उन्मळून पडली. यात एकाचा मृत्युही झाला. या घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या आठवड्यात ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या नियंत्रण कक्षाला भेट देऊन कामाचा आढावा घेतला. वृक्ष उन्मळून पडल्याच्या घटनेची दखल घेत वृक्ष प्राधिकरण विभागाच्या सहाय्यक आयुक्ताची त्यांनी बदली केली तर, आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्याला निलंबनाचा इशारा दिला होता. तसेच पालिका अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली होती.

आपत्ती व्यवस्थापन, टीडीआरएफ, वृक्ष प्राधिकरण आणि पाऊस-वाऱ्याशी संबंधित काम करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांचे मूल्यमापन केले जाईल. चांगले काम करणाऱ्यांचा सन्मान केला जाईल, तर कर्तव्यात कसूर करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला होता. ही यंत्रणा सक्षम करण्याचे निर्देशही दिले होते. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी शहरातील रस्ते, पूल, गटारे आणि विकासकामांची जबाबदारी सांभाळणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर आता वृक्ष छाटणी आणि धोकादायक झाडांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सोपविण्याचा निर्णय घेतला असून तसे परिपत्रकही काढले आहे. वृक्षप्राधिकरण आणि उद्यान विभाग अस्तित्वात असतानाही कार्यकारी अभियंते आणि उपअभियंत्यांना या कामासाठी पुढे केल्याने ठाणे महापालिकेचा अजब कारभार समोर आला आहे.

पावसाळ्याच्या काळात झाडे कोसळण्याच्या घटनांनंतर ठाणे महापालिकेने विशेष आदेश जारी करून प्रत्येक प्रभागात सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंते आणि उपअभियंत्यांवर वृक्ष व्यवस्थापनाची जबाबदारी सोपवली आहे. या अधिकाऱ्यांनी वृक्षांच्या खोडाभोवतीचे काँक्रीट काढणे, उद्यान विभागाशी समन्वय साधून छाटणी करून घेणे, झाडांवरील धोकादायक वीजतारा हटविणे आणि अन्य आपत्ती प्रतिबंधक उपाययोजना कराव्यात, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

मात्र, शहरातील रस्ते, पूल, इमारती, जलनिस्सारण आणि इतर विकास प्रकल्पांची जबाबदारी आधीच सार्वजनिक बांधकाम विभागावर असून या विभागात आधीच अभियंत्यांची कमतरता असल्याने दुहेरी कामाचा ताण आहे. त्यातच त्यांच्यावर वृक्ष व्यवस्थापनाची अतिरिक्त जबाबदारी टाकल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वृक्ष छाटणी आणि देखभालीसाठी स्वतंत्र उद्यान विभाग व वृक्षप्राधिकरण असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाला या कामात उतरविण्यामागील कारण काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. चौकट वृक्षांच्या खोडाभोवतीचे काँक्रीट आणि पेव्हर ब्लॉक हटविण्याची मोहीम ठाणे महापालिकेने दोन वर्षांपुर्वी राबविली. त्यात शहरातील ९,२४३ वृक्षांची आळी मोकळी करण्यात आली आहे.

यामध्ये वर्तकनगर प्रभागात सर्वाधिक १,९०४, उथळसरमध्ये १,६९४, माजिवडा-मानपाड्यात १,५२८ आणि नौपाडा-कोपरीत १,४७९ वृक्षांच्या खोडाभोवतीचे काँक्रीट हटविण्यात आले आहे. तर दिवा (२०८) आणि मुंब्रा (२७३) या प्रभागांमध्ये सर्वात कमी कामे झाली आहेत, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.

पावसादरम्यान मोठ्या प्रमाणात वृक्ष पडझड झाली. हा कचरा हटविण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाकडील मनुष्यबळ अपुरे पडले. त्याच्या मदतीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंत्यांची पावसाळ्यापुर्वी आपत्कालीन व्यवस्था म्हणून नेमणुक करण्यात आली आहे. वृक्षांची योग्य छाटणीच्या कामासाठी अभियंते मदत करणार आहेत तर, झाडाचे खोड काँक्रीट मुक्त करण्याचे काम अभियंते करणार आहेत.

  • प्रशांत रोडे, अतिरिक्त आयुक्त, ठाणे महापालिका