जांभळी नाका परिसरात व्यापारी आक्रमक झाल्याने पथक माघारी
ठाणे शहरात पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी महापालिका प्रशासनाने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या ग्राहकांना देणाऱ्या विक्रेत्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. या कारवाईसाठी विशेष पथके तयार करण्यात आली असून त्यांच्यामार्फत गेल्या तीन दिवसांपासून शहरात कारवाई सुरू आहे. सोमवारी सकाळी ठाण्यातील जांभळी नाका परिसरातील भाजी मार्केटमध्ये पथकामार्फत कारवाई सुरू असताना काही व्यापाऱ्यांनी त्यास विरोध केल्याचा प्रकार घडला. यामुळे महापालिकेच्या पथकाला कारवाईविनाच रिकाम्या हाती माघारी परतावे लागले.
पर्यावरणास घातक असलेल्या ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर राज्य शासनाने बंदी घातली आहे. असे असले तरी, शहरातील विविध विक्रेत्यांमार्फत अशा पिशव्या ग्राहकांना दिल्या जातात. त्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसून येते. मध्यंतरी महापालिका प्रशासनाने अशा विक्रेत्यांविरोधात जोरदार कारवाई सुरू केली होती. गेल्या काही महिन्यांपासून ही कारवाई थंडावल्यामुळे शहरात अशा पिशव्यांचा वापर पुन्हा वाढू लागल्याचे चित्र आहे.
या पाश्र्वभूमीवर महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अशा पिशव्यांविरोधात कारवाई करण्याचे आदेश घनकचरा विभागाला दिले आहेत. त्यानुसार गेल्या तीन दिवसांपासून या विभागाने विशेष मोहीम हाती घेतली असून त्यासाठी प्रत्येक प्रभाग समिती स्तरावर एक पथक तयार करण्यात आले आहे.
या पथकामध्ये दहा ते वीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ही पथके शहरातील विविध दुकाने, हातगाडय़ा, स्टॉलवरील पिशव्यांची तपासणी करण्यात येत आहे. या मोहिमेत आतापर्यंत एक टन प्लास्टिकच्या पिशव्या पथकाने जप्त केल्या आहेत.
दंडाची आकारणी
या कारवाईमध्ये पाचशे रुपयांपासून ते पाच हजारांपर्यंत दंड आकारला जात असल्यामुळे व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. यातूनच या कारवाईस व्यापाऱ्यांकडून विरोध होऊ लागला असून सोमवारी सकाळी ठाण्यातील जांभळी नाकामधील जिजामाता भाजी मार्केटमध्ये व्यापाऱ्यांनी पथकाच्या कारवाईस विरोध केल्याचा प्रकार घडला. व्यापाऱ्यांच्या विरोधामुळे पथकाला अखेर कारवाईविनाच रिकाम्या हाती परतावे लागल्याचा प्रकार घडला. या संदर्भात महापालिकेकडून कोणतीही माहिती मिळू शकली नाही.

व्यापारी काय म्हणतात..
निर्मिती करणारे आणि विक्रेत्यांपर्यंत पोहोचविणारे अशा दोघांवर आधी कारवाई करा, मगच आमच्याकडे या.. असा सूर व्यापाऱ्यांनी या वेळी लावला. आम्ही पिशव्या ठेवायच्या नाहीत, असा निर्णय मध्यंतरी घेतला, मात्र मार्केटबाहेरील विक्रेत्यांकडून सर्रासपणे पिशव्या ग्राहकांना देण्यात येत होत्या. यामुळे अनेक ग्राहक पिशव्या मिळत नसल्यामुळे या विक्रेत्यांकडे वळत होते. महापालिकेच्या कारवाईस आमचा विरोध नाही, पण त्यांनी या पिशव्या बनविणारे आणि त्या व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचविणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.

Big falls in Sensex and Nifty
सेन्सेक्स अन् निफ्टीत मोठ्या प्रमाणात पडझड; शेअर बाजाराच्या घसरणीला ‘या’ तीन गोष्टी ठरल्या कारणीभूत
Concerned about the security of Indians in Iranian custody
जहाजावरील कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय चिंतेत; इराणच्या ताब्यातील भारतीयांच्या सुरक्षेची चिंता
Municipal Corporation ignoring quakes in navi mumbai delayed in making rule for builders
नवी मुंबई : हादऱ्यांच्या मालिकेकडे महापालिकेचा काणाडोळा, बिल्डरांच्या सोयीसाठी नव्या नियमावलीला मुहूर्त सापडेना
demolition of seven bungalows became controversial
विश्लेषण : सात बंगल्यातील पाडकाम वादग्रस्त का ठरले? मजबूत वास्तू धोकादायक घोषित करण्यामागे पालिका-विकासकांचे साटेलोटे?