ठाणे : राज्य शासनाच्या नगरविकास विभागाच्या निर्देशानुसार, ठाणे महापालिकेतील १७७३ पदांच्या भरतीसाठी गेल्या काही महिन्यांपासून भरती प्रक्रीया सुरू असतानाच, राज्याच्या कौशल्य विकास विभागाने केलेल्या नव्या सुचनांवर पालिकेने नगरविकास विभागाकडे अभिप्राय मागविला आहे. यामुळे बहुचर्चित भरती प्रक्रीया लांबणीवर पडल्याचे चित्र आहे. कौशल्य विकास विभागाच्या अभ्यास क्रमाचे प्रमाणपत्र विचारात घेण्याची सुचना असून ती लागू केल्यास यापुर्वी दाखल झालेले उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची भिती व्यक्त होत आहे.
ठाणे महापालिकेची स्थापना १९८२ मध्ये झाली असून ही ‘ब’ वर्ग महापालिका आहे. ठाणे महापालिकेत शिक्षण मंडळासह ९०८८ तर परिवहन सेवेत २ हजार ६०० कर्मचारी आहेत. तसेच २५०० कंत्राटी कामगार आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार ठाणे महापालिकेची लोकसंख्या १८ लाख ४१ हजार इतकी आहे. ही लोकसंख्या आता २६ लाखांच्या पुढे गेली आहे. गेल्या काही वर्षात पालिका क्षेत्राचे विस्तारीकरण झाले आहे. त्यातच गेल्या काही वर्षांपासून दर महिन्याला अधिकारी आणि कर्मचारी सेवा निवृत्त होण्याचे प्रमाण वाढले आहे.
यामुळे सद्यस्थितीत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कामाचा दुहेरी ताण असून हा कमी करण्यासाठी राज्य सरकारने आकृतीबंधमध्ये ८८० वाढीव पदांना मंजुरी दिली. पण, ही भरती काही कारणास्तव होऊ शकलेली नव्हती. यामुळे भरती प्रक्रीया राबविण्याची मागणी सातत्याने होत होती. दरम्यान, गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात पालिका प्रशासनाने १७७३ पदांसाठी भरती प्रक्रीया राबविण्याचा निर्णय घेतला आणि त्यास मुदत वाढही दिली होती. परंतु पालिका निवडणुक कामकाजामुळे हि प्रक्रीया थांबली होती. निवडणुकीनंतर पालिकेने पुन्हा प्रक्रीया सुरू केली असली तरी, राज्याच्या कौशल्य विकास विभागाने केलेल्या नव्या सुचनेमुळे ती लांबणीवर पडल्याचे समोर आले आहे.
नव्या सुचनेमुळे प्रक्रीया रखडली
कौशल्य विकास विभागाने स्वच्छता निरीक्षक, परवाना निरिक्षक यासह तीन ते चार पदांसाठी त्यांच्या विभागाच्या अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र विचारात घेण्याबाबत पालिका प्रशासनाला कळविले आहे. परंतु नगरविकास विभागाने दिलेल्या निर्देशानुसार ही भरती प्रक्रीया सुरू आहे. त्यामुळे पालिकेने कौशल्य विकास विभागाच्या सुचनेबाबत नगरविकास विभागाकडे अभिप्राय मागविला आहे. यामुळे संपूर्ण प्रक्रिया लांबणीवर पडल्याचे चित्र असून, उमेदवारांमध्ये संभ्रम आणि नाराजी वाढत आहे. तसेच प्रमाणपत्र विचारात घेतले तर, अनेकांचे अर्ज अपात्र ठरण्याची चिन्हे आहेत. विशेष म्हणजे, अर्ज करताना सुरुवातीला अशा कोणत्याही अटी नमूद करण्यात आलेल्या नव्हत्या. त्यामुळे नवीन अट लागू झाल्यास आधीच अर्ज केलेल्या उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरण्याची भीती व्यक्त होत आहे.
कोणत्या पदांसाठी भरती अग्निशमन विभागात सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी १३, चालक,यंत्रचालक २०७ आणि अग्निशमन जवान ३८१ अशी ६०१ पदे भरली जाणार आहेत. आरोग्य विभागात परिचारीका ४५७, प्रसाविका ११६, ज्युनिअर टेक्नीशियन ६०, दवाखाना आया ४८, वॉर्डबॉय ३७, मॉरच्युरी अटेंडन्ट २८, शस्त्रक्रिया सहाय्यक २५, मल्टी पर्पज वर्कर ३३, सहाय्यक क्ष किरण तंत्रज्ञ, लॅबोरेटरी अटेंडन्ट, न्हावी, अटेंडन्ट, ब्लड बँक टेक्निशिअन, सीटी स्कॅन तंत्रज्ञ, मेडिकल रेकॉर्ड ऑफीसर, फिजीसिस्ट, औषध निर्माण अधिकारी, डायटीशीअन, लिपीक, सहाय्यक परवाना निरिक्षक यासह तब्बल ६५ प्रकारांची पदे भरली जाणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंता १ (नागरी) २४, कनिष्ठ अभियंता १ ( यांत्रिक ) १६, कनिष्ठ अभियंता (विद्युत) ४, कनिष्ठ अभियंता २ – ६३ पदे भरली जाणार आहेत. कोट ठाणे महापालिकेतील भरती प्रक्रीया शासनाच्या निर्देशाप्रमाणे लवकरात लवकर पुर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत. राज्याच्या कौशल्य विकास विभागाने काही सुचना केल्या असून त्याचा अभिप्राय नगरविकास विभागाकडे मागितला असून त्यासाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत.-गजानन गोदेपुरे उपायुक्त, ठाणे महापालिका
