ठाणे : येत्या काही महिन्यात होणाऱ्या ठाणे महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना आणि आरक्षण सोडत प्रक्रिया उरकल्यानंतर ठाणे महापालिकेने आता प्रारुप मतदार याद्या जाहीर केल्या आहेत. यानुसार बाळकुम भागातील प्रभाग क्रमांक ८ मध्ये सर्वाधिक तर, साकेत-राबोडी या प्रभाग क्रमांक १० मध्ये सर्वात कमी मतदार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार ठाणे शहराची लोकसंख्या १८ लाख ४१ हजार ४८८ इतकी आहे. तर, २०१७ साली झालेल्या निवडणुकीत ३३ प्रभाग होते. त्यावेळी मतदारांची संख्या १२ लाख २८ हजार ६०६ इतकी होती. दर दहा वर्षांनी जनगणना केली जाते. परंतु करोनामुळे यंदा जनगणना होऊ शकली नाही. त्यामुळे २०११ च्या जणगणनेनुसार यंदा प्रभाग रचना अंतिम करण्यात आली असून ती जवळपास २०१७ प्रमाणेच आहे. असे असले तरी, मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदार संख्येत वाढ झालेली आहे.

मागील निवडणूकीत म्हणजेच २०१७ मध्ये एकूण मतदारांची संख्या १२ लाख २८ हजार ६०६ इतकी होती. त्यात ५ लाख ६१ हजार ८७ पुरुष, ६ लाख ६७ हजार ५०४ स्त्री आणि १५ इतर मतदारांचा समावेश होता. यंदाच्या निवडणुकीत एकूण १६ लाख ४९ हजार ८६२ इतके मतदार आहेत. त्यात ८ लाख ६३ हजार ८७४ पुरुष, ७ लाख ८५ हजार ८३० स्त्री आणि १५८ इतर मतदार आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणूकीत ४ लाख २१ हजार २५६ इतके मतदार वाढले आहेत. त्यात १ लाख ९६ हजार ३७० पुरुष, २ लाख २४ हजार ७४३ स्त्री आणि १४३ इतर मतदार वाढल्याचे दिसून येत आहे.

जुलै २०२५ मध्ये अंतिम करण्यात आलेली मतदार संख्या यंदाच्या निवडणुकीत ग्राह्य धरण्यात आलेली आहे. ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ८ मध्ये बाळकुम, माजिवडा, हायलॅन्ड या भागांचा समावेश असून येथे सर्वाधिक म्हणजेच, ६६ हजार ८३५ मतदार आहेत. त्यात ३२ हजार ४५८ स्त्री आणि ३४ हजार ३७१ पुरुष मतदारांचा समावेश आहे. त्याखालोखाल घोडबंदर भागातील ओवळा, कासारवडवली, भाईंदरपाडा, कावेसर हा परिसर प्रभाग क्रमांक १ मध्ये येत असून येथे ६० हजार ६८ मतदार आहेत. त्यानंतर मुंब्र्यातील चर्नीपाडा, देवरीपाडा, रशिद कंपाऊंड हा परिसर प्रभाग क्रमांक ३३ येत असून येथे ५९ हजार ९६२ मतदार आहेत. तर, साकेत, राबोडी, के-व्हीला, वृंदावन हा परिसर प्रभाग क्रमांक १० मध्ये येत असून येथे सर्वात कमी म्हणजेच, ४० हजार ८८८ इतके मतदार आहेत.

प्रारुप मतदार यादीवर हरकती सुचना दाखल करण्याची अंतिम तारीख २७ नोव्हेंबर आहे. ५ डिसेंबर रोजी हरकतींवर निर्णय घेऊन प्रभाग निहाय अंतिम याद्या अधिप्रमाणित करुन प्रसिध्द करण्यात येणार आहेत. ८ डिसेंबर रोजी मतदान केंद्राच्या ठिकाणी यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. १२ डिसेंबर रोजी मतदार केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे.