ठाणे – यंदाच्या आर्थिक वर्ष संपत आले तरी ठाणे महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाकडून अपेक्षित कर वसुली होऊ शकलेली नसल्याची बाब अर्थसंकल्पातून उघडकीस आली असून या मुद्द्यावरून टिका होऊ लागताच पालिका प्रशासनाने आता थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्याचाच एक भाग म्हणून ५३ लाखांचा मालमत्ता कर थकविणाऱ्या कळवा लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाला पालिकेने टाळे लावले आहे. यामुळे या कार्यालयाचे कामकाज ठप्प झाले आहे.
ठाणे महापालिकेचा मालमत्ता कर हा उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत मानला जातो. मागील अर्थसंकल्पात पालिकेने या विभागाला ९२० कोटी रुपये कर वसुलीचे उद्दीष्ट ठरवून दिले होते. प्रत्यक्षात डिसेंबर महिनाअखेर ५३६ कोटी ३५ लाखांची कर वसुली संबंधित विभागाने केल्याचे यंदाच्या अर्थसंकल्पातून स्पष्ट झाले आहे. मध्यंतरी आयुक्त सौरभ राव यांनी मालमत्ता कर वसुलीबाबत नाराजी व्यक्त करून थकबाकीदारांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. यामध्ये कर थकबाकी असलेल्या खासगी मालमत्तांवर कारवाई करण्यात येत होती.
यात मालमत्ता सील करण्यात येत होत्या. असे असले तरी, शहरातील शासकीय कार्यालयांकडून थकीत कर वसुलीसाठी फारशी पाऊले उचलण्यात येत नव्हती. दरम्यान, यंदाच्या आर्थिक वर्ष संपत आले तरी ठाणे महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाकडून अपेक्षित कर वसुली होऊ शकलेली नसल्याची बाब अर्थसंकल्पातून उघडकीस आली असून या मुद्द्यावरून टिका होऊ लागताच पालिका प्रशासनाने आता थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
पालिकेचा मालमत्ता कर थकविणाऱ्या शासकीय कार्यालयांना टाळे लावण्याची कारवाई करण्यात येत असून अशीच कारवाई कळव्यातील शासकीय कार्यालयांवर करण्यात आली आहे. कळवा येथे लघुपाटबंधारे विभागाचे कार्यालय असून येथील संबंधित विभागाच्या अभियंतांची कार्यालयांना टाळे लावण्यात आले आहे. या विभागातील जलसंपदा, मृदू व सर्वेक्षण, घाटघर जल विद्युत विभाग, पाटबंधारे, जल गुणवंता प्रयोगशाळा, जलसंधारण अशा सर्व विभागांचे मिळून तब्बल एकूण ५३ लाख रुपयांचे कर थकबाकी असल्याने ही कारवाई महापालिकेने केली आहे. या वृत्तास कळवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त ललिता जाधव यांनी दुजोरा दिला आहे. गेले पाच वर्षे आमच्या विभागाकडून मालमत्ता कर थकबाकीबाबत वारंवार नोटीसा देण्यात येत आहेत. परंतु त्यास प्रतिसाद मिळत नसल्याने ही कारवाई केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
