ठाणे – परप्रांतीयांना मराठी शिकवण्यासाठी राज्य सरकारकडून विशेष मोहीम राबविण्याची घोषणा होत असताना, ठाणे महापालिकेच्या फलकांवरच अशुद्ध मराठी झळकत असल्याचा प्रकार समोर आला आहे. कळवा येथील मनीषा नगर परिसरातील टीएमटी बस थांब्यावर गेली चार वर्षे ‘पुस्तकानचे घर’ असा चुकीचा शब्दप्रयोग असलेला फलक लावण्यात आल्याने प्रशासनाच्या भाषाशुद्धतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
मराठी भाषा संवर्धन आणि प्रचारासाठी राज्य सरकारकडून सातत्याने विविध उपक्रम राबविले जात आहेत. सरकारी कार्यालये, सार्वजनिक फलक, परिवहन सेवा आणि स्थानकांवर मराठीचा वापर सक्तीचा करण्यावर भर दिला जात आहे. अलीकडेच परप्रांतीय रिक्षाचालकांना मराठी शिकवण्यासाठी विशेष मोहीम आणि त्यासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद जाहीर करण्यात आली. मात्र, याच पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेच्या अखत्यारीतील फलकांवरच अशुद्ध मराठी आढळून आल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर टीका होत आहे. कळवा येथील मनीषा नगर परिसरातील टीएमटी बस थांब्यावर गेली सुमारे चार वर्षे अशुद्ध मराठीत लिहिलेला फलक लावण्यात आल्याने प्रशासनाच्या भाषाशुद्धतेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
येथील फलकावर ‘पुस्तकानचे घर’ असा चुकीचा शब्दप्रयोग करण्यात आला असून ‘महापालिका’ हा शब्दही अशुद्ध लिहिल्याचे निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे, हा फलक मोठ्या ठळक अक्षरात सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आला असून दररोज हजारो नागरिकांच्या नजरेस पडत आहे. तरीही याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याची टीका स्थानिकांकडून केली जात आहे. प्रशासनाच्या अखत्यारीतील फलकांवरच भाषेची मोडतोड होत असल्याने ‘मराठीचा आग्रह फक्त सामान्य नागरिकांसाठीच का?’ असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
योग्य शब्द ‘पुस्तकांचे घर’ असा असताना महापालिकेकडूनच चुकीची भाषा वापरली जात असेल, तर मराठी भाषेबाबत प्रशासन किती गंभीर आहे हे स्पष्ट होते, अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली. अनेक वर्षांपासून हा फलक तसाच असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. संबंधित फलक तातडीने दुरुस्त करून भाषाशुद्धतेबाबत दक्षता घ्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
