कचरा विल्हेवाटीसाठी नवे तंत्रज्ञान?

ठाणे महापालिकेकडून डायघर भागात चाचपणी; नव्याने निविदा मागवल्या

ठाणे महापालिकेकडून डायघर भागात चाचपणी; नव्याने निविदा मागवल्या

ठाणे : कालबाह्य़ तंत्रज्ञान तसेच खर्चाचा भार वाढू लागल्याने डायघर येथील बहुचर्चित कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्पाला तिलांजली दिल्याने ठाणे महापालिकेने पुन्हा याच ठिकाणी नव्या तंत्रज्ञानावर आधारित ऊर्जा अथवा इंधन निर्मितीचा नवा प्रकल्प राबविता येऊ शकतो का याची चाचपणी सुरू केली आहे. दिवा परिसरात होणाऱ्या बेकायदा कचरा फेकीमुळे महापालिका यापूर्वी अनेकदा अडचणीत सापडली आहे. त्यामुळे डायघर भागात शहरातील सुका आणि ओला कचरा नेऊन त्या ठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाटीचे नवे तंत्रज्ञान विकसित करता येऊ शकते का, याची चाचपणी करण्यासाठी महापालिकेने नव्याने निविदा मागविल्या आहेत.

या निविदेद्वारे देशभरात उपलब्ध असलेल्या नव्या तंत्रज्ञानाची माहिती घेतली जाणार आहे. तसेच नव्या प्रकल्पासाठी महापालिकेला कोणताही खर्च करावा लागू नये अशा पद्धतीने निविदेची आखणी करण्यात आली आहे, असा दावा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला.

ठाणे शहरात दररोज १ हजार ३९ टन कचरा निर्माण होत असतो. त्यामध्ये ६२४ टन ओला तर ३९० सुका कचरा असतो. महापालिकेची स्वत:ची हक्काची कचराभूमी नाही. त्यामुळे शहरातील कचऱ्याची शास्त्रोक्त पद्घतीने विल्हेवाट लावणे महापालिकेला शक्य होत नाही. पाठपुरावा करूनही कचराभूमीसाठी जागा मिळत नसल्याने यासंबंधीच्या पूर्वीच्या घोषणाही फुसक्या ठरल्या आहेत. जागा मिळत नसल्याने निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करून डायघर येथील प्रशस्त जागेवर १३ मेगावॉट वीजनिर्मितीचा प्रकल्प राबविण्याचा निर्णय तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या कार्यकाळात घेण्यात आला होता. खासगी लोकसहभागातून राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पासाठी ठेकेदाराची नेमणूक करून प्रकल्पाचे भूमिपूजन उरकण्यात आले होते.

यंदाच्या वर्षांत हा प्रकल्प कार्यान्वित होणार होता. परंतु नव्या नियमावलीमुळे हा प्रकल्प खर्चीक वाटू लागल्याने तसेच तंत्रज्ञान कालबाह्य़ झाल्यामुळे महापालिकेने हा प्रकल्प काही महिन्यांपूर्वी रद्द केला. सर्वसाधारण सभेनेही त्यास मंजुरी दिली. ठाणे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही एक बैठक घेऊन जुना प्रकल्प रद्द करून त्याऐवजी नव्या तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प राबविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी नव्या तंत्रज्ञानाची माहिती घेण्यास सुरुवात केली असून त्यासाठी घनकचरा विभागाने एक निविदा काढली आहे. महापालिकेने काढलेल्या निविदेत देशभरातील कंपन्यांना त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या नव्या तंत्रज्ञानाची माहिती देण्यास सांगितले आहे. या माहितीच्या आधारे चांगल्या नव्या तंत्रज्ञानाची निवड करून त्याद्वारे कामाची निविदा काढली जाणार आहे. ही प्रक्रिया राबविण्यास चार ते सहा महिन्यांचा काळ लागू शकतो, अशी माहिती घनकचरा विभागाकडून देण्यात आली.

जुना प्रकल्प रद्द होण्याचे कारण..

कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याचा प्रकल्प उभारणीसाठी भांडवली तसेच परिचालन व निगा-देखभाल खर्चात वाढ झाली तर पालिकेने संस्थेला तीन पर्याय उपलब्ध करून दिले होते. त्यात प्रकल्प कालावधीत वाढ करणे, टिपिंग शुल्काचे दर वाढवून मिळणे आणि प्रकल्प उभारणीसाठी भांडवली तसेच परिचालन व निगा देखभाल करण्यासाठी एक रकमी खर्च मिळणे असे तीन पर्याय होते. त्यापैकी प्रकल्प उभारणीसाठी भांडवली तसेच परिचालन व निगा देखभाल करण्यासाठी एक रकमी खर्च मिळणे हा पर्याय ठेकेदाराने निवडला होता. या पर्यायानुसार महापालिकेला संबंधित ठेकेदाराला भांडवली खर्चासाठी ७८ कोटी आणि परिचालन व निगा देखभालीसाठी दरवर्षी ७ कोटी ८ लाख रुपये द्यावे लागणार होते. ३५ वर्षे ही रक्कम द्यावी लागणार होती. परंतु करोनाकाळात इतका आर्थिक भार उचलणे शक्य नसल्यामुळेच पालिकेने हा प्रकल्प रद्द केला. तसेच प्रकल्पाचे तंत्रज्ञानही कालबाह्य़ झाले होते, हे सुद्धा प्रकल्प रद्द करण्यामागे कारण होते, अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली.

माहिती पालिकेच्या संकेतस्थळावर

नव्या प्रकल्पासाठी पालिकेला एक रुपयाही खर्च करावा लागू नये आणि कचरा विल्हेवाटीचाही प्रश्न मार्गी लागावा, अशी भूमिका आयुक्तांनी घेतली आहे. त्यामुळे डायघर येथील प्रशस्त जागा नव्या प्रकल्पासाठी विनामूल्य वापरण्यास दिली जाईल. या जागेवर १८०० मेट्रिक टन क्षमतेचा प्रकल्प संबंधित कंपनीने उभा करावा आणि प्रकल्पाचे काम दोन वर्षांत पूर्ण करावे, अशी अट ठेवली आहे. या प्रकल्पाविषयी पारदर्शकता असावी यासाठी संपूर्ण माहिती पालिकेच्या संकेतस्थळावर आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Thane municipal corporation use new technology for waste disposal zws