ठाणे : ठाणे महापालिकेच्या नऊ प्रभाग समित्यांच्या सभापती पदाच्या निवडणुकीत शिंदे शिवसेनेचे सात, तर भाजपचा एक सभापती बिनविरोध निवडून आल्याने महायुतीने आठ प्रभाग समित्यांवर वर्चस्व मिळवले. मुंब्रा प्रभाग समितीच्या सभापती पदासाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या दीपाली भगत यांनी एमआयएमच्या नफिज अन्सारी यांचा १० विरुद्ध चार मतांनी पराभव केला.

एमआयएमकडे पाच नगरसेवकांचे संख्याबळ असतानाही नगरसेविका सहर शेख मतदानावेळी अनुपस्थित राहिल्याने अन्सारी यांना चारच मते मिळाली. त्यामुळे मुंब्र्याच्या राजकारणात निकालापेक्षा सहर शेख यांच्या गैरहजेरीचीच अधिक चर्चा रंगली.

ठाणे महापालिकेच्या रखडलेल्या नऊ प्रभाग समिती सभापती पदाची निवडणुक मंगळवारी पार पडली. या निवडणुकीसाठी ३१ जुलै रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. नऊ प्रभाग समित्यांसाठी एकूण दहा उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. यापैकी आठ प्रभाग समित्यांत प्रत्येकी एकच अर्ज असल्याने सभापतींची निवड बिनविरोध झाली.

शिंदे शिवसेनेच्या वतीने नौपाडा-कोपरी प्रभाग समितीसाठी मिनल संखे, वागळे प्रभाग समितीसाठी एकता भोईर, मानपाडा-माजिवडा प्रभाग समितीसाठी सिद्धार्थ ओवळेकर, कळवा प्रभाग समितीसाठी विजया लासे, लोकमान्य-सावरकरनगर प्रभाग समितीसाठी निर्मला कणसे, दिवा प्रभाग समितीसाठी दीपक जाधव व वर्तकनगर प्रभाग समितीसाठी जयश्री डेव्हिड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. तर महायुतीतील जागावाटपानुसार उथळसर प्रभाग समिती भाजपच्या वाट्याला आली असून, येथून भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या सर्व ठिकाणी एकच अर्ज असल्याने निवड बिनविरोध झाली.

राष्ट्रवादीची बाजी, एमआयएमला धक्का

मुंब्रा प्रभाग समितीच्या सभापती पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नगरसेविका दीपाली भगत व एमआयएमचे नफिज अन्सारी यांच्यात थेट लढत झाली. ठाणे महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली. मुंब्रा प्रभाग समितीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे १०, एमआयएमचे पाच आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचा एक नगरसेवक आहे. त्यामुळे संख्याबळाच्या आधारे दीपाली भगत यांचा विजय निश्चित मानला जात होता. सकाळी ११ वाजता निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी १५ मिनिटांचा अवधी देण्यात आला. मात्र, दोन्ही उमेदवारांनी अर्ज मागे न घेतल्याने निवडणुक प्रक्रिया पार पडली. दीपाली भगत यांना १०, तर एमआयएमच्या नफिज अन्सारी यांना चार मते मिळाली. यात भगत यांनी विजय मिळवत एमआयएमला धक्का दिला.

दोन नगरसेवक गैरहजर

एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख निवडणूक प्रक्रिया सुरू असताना सभागृहात उपस्थित नव्हत्या. प्रक्रियेनंतर अर्धा तासाने त्या सभागृहात दाखल झाल्या. यामुळे एमआयएमच्या नफिज अन्सारी यांना पाचऐवजी चार मतेच मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक राजन किणे हेही मतदानावेळी अनुपस्थित होते.