ठाणे – ठाणे महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मालमत्ता कर तसेच हस्तांतरण शुल्कात वाढ केली असतानाच, दुसरीकडे पालिका प्रशासनाने पाणी देयक थकबाकीदारांवर सवलतीची खैरात केल्याचे समोर आले आहे. थकीत पाणी देयकांवरील व्याज आणि दंड म्हणजेच प्रशासकीय आकार १०० टक्के माफ करण्याची सवलत योजना महापालिकेने जाहीर केली आहे. १ सप्टेंबरपासून सुरू झालेली ही सवलत ३१ डिसेंबर २०२६ पर्यंतच राहणार असून, त्यानंतर थकबाकीदारांवर नळजोडणी तोडण्याची कारवाई केली जाणार आहे.

ठाणे महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मालमत्ता कर तसेच हस्तांतरण शुल्कात वाढ केली आहे. यावरून पालिका प्रशासनासह सत्ताधारी शिवसेनेवर टिका होत आहे. थकीत देयकांची वसुली करा मग, करदर वाढ करा असा आग्रह भाजपसह विरोधी पक्षांनी धरला होता. तसेच या कर दरवाढीस विरोध दर्शविला होता. एकूणच यावरून राजकीय वातावरण तापलेले असतानाच, त्यात आता पालिकेने पाणी देयक थकबाकीदारांवर सवलतीची खैरात केल्याचे समोर आले आहे.

थकीत पाणी देयकांवरील व्याज आणि दंड म्हणजेच प्रशासकीय आकार १०० टक्के माफ करण्याची सवलत योजना महापालिकेने जाहीर केली आहे. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी घरगुती नळजोडणीधारकांना मागील थकीत पाणी बिलाची संपूर्ण रक्कम आणि चालू आर्थिक वर्ष म्हणजेच २०२६-२७ चे देयक अशी एकरकमी भरावी लागणार आहे. ही रक्कम एकरकमी भरल्यानंतर पात्र ग्राहकांच्या थकबाकीवरील प्रशासकीय आकार म्हणजेच व्याज आणि दंड पूर्णपणे माफ केला जाणार आहे. ही योजना केवळ घरगुती पाणी नळजोडणीधारकांसाठी आहे. व्यावसायिक पाणी ग्राहकांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

चार महिन्यांचीच मुदत ही सवलत कायमस्वरूपी नसून १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२६ या चार महिन्यांच्या कालावधीपुरतीच लागू राहणार आहे. त्यामुळे थकीत पाणी बिल असलेल्या घरगुती ग्राहकांना या कालावधीत आपली थकबाकी भरून व्याज-दंडाच्या १०० टक्के माफीचा लाभ घेता येणार आहे, असे पालिकेने म्हटले आहे. महापालिकेने सवलत देतानाच थकबाकीदारांना इशाराही दिला आहे. १ जानेवारी २०२७ नंतरही पाणी बिलाची थकबाकी कायम राहिल्यास संबंधित नळजोडणी खंडित करून पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे सवलतीचा कालावधी संपल्यानंतर थकबाकीदारांवर थेट कारवाई होण्याची शक्यता आहे.