ठाणे – ठाणे महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने ठरवून दिलेल्या ९१५ कोटींच्या उद्दीष्टापैकी ८७८ कोटी रुपयांचा कर वसुल केला असतानाच, दुसरीकडे पाणी पुरवठा विभागाने २५० कोटींच्या उद्दीष्टापैकी १३७ कोटींचा कर वसुल केला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत ११ कोटींनी कर वसुलीत घट झाली आहे. थकीत पाणीपट्टी वसुलीसाठी कठोर कारवाई करूनही ठाणे महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग अपेक्षित यश मिळवू शकलेला नसल्याचे स्पष्ट होत आहे.

ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पात विविध विभागांना कर वसुलीचे उद्दीष्ट ठरवून देण्यात येते. पालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत मानल्या जाणाऱ्या मालमत्ता कर विभागाने ठरवून दिलेल्या ९१५ कोटींच्या उद्दीष्टापैकी ८७८ कोटी रुपयांचा कर वसुल केला आहे. या करवसुलीची टक्केवारी ९६ टक्के इतकी आहे. असे असले तरी, दुसरीकडे पाणीपुरवठा विभाग कर वसुली पिछाडीवर असल्याचे दिसून येत आहे.

महापालिकेने २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी पाणीपट्टी वसुलीचे २५० कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र, ३१ मार्च अखेर केवळ १३७ कोटी ३२ लाख १ हजार ४६३ रुपयांचीच वसुली झाली आहे. मागील वर्षी म्हणजेच, २०२४-२५ मध्ये २२५ कोटींचे उद्दिष्ट असताना १४९ कोटींची वसुली झाली होती. यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ११ कोटी ६८ लाख रुपये कमी कर जमा झाला आहे.

ठाणे पालिकेच्या निवडणुक कामकाजात अधिकारी आणि कर्मचारी व्यस्त होते. त्याचा परिणाम कर वसुलीवर झाला होता. निवडणूक प्रक्रिया संपताच पाणीपट्टी वसुलीसाठी प्रशासनाने जोरदार मोहीम सुरू केली होती. थकबाकीदारांच्या नळजोडण्या तोडणे, मीटर रूमला टाळे ठोकणे अशा कारवाया शहरभर करण्यात आल्या. याशिवाय १ मार्च ते १६ मार्च दरम्यान १०० टक्के दंडमाफी योजना राबवून १४ कोटी ८८ लाख रुपयांची वसुली करण्यात आली. तरीही एकूण वसुलीचे लक्ष्य गाठण्यात पाणी पुरवठा विभागाला अपयश आल्याचे दिसून येत आहे.

थकीत पाणीपट्टी वसुलीसाठी कठोर कारवाई करूनही ठाणे महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग अपेक्षित यश मिळवू शकलेला नाही. नळजोडण्या खंडित करणे, मीटर रूम सील करणे, तसेच दंडमाफी योजना राबवूनही विभागाची कामगिरी समाधानकारक ठरली नाही. परिणामी, यंदाच्या आर्थिक वर्षात वसुलीत घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे.