ठाणे : ठाण्यातील वर्तकनगर परिसरात रेमंड कंपनीच्या जागेवर महापालिका आपल्या मुख्यालयासाठी ३२ मजल्यांची इमारत उभारणार आहे. याशिवाय, महासभा आणि इतर समित्यांच्या सभांसाठी पाच मजल्यांची वेगळी इमारत असणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात या पहिल्या टप्प्यांतील कामासाठी ७२७ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला असला तरी इमारत पूर्ण होता होता हा खर्च हजार कोटी रुपयांचा टप्पा ओलांडेल अशी शक्यता व्यक्त होत आहे. सुमारे १३ लाख चौरस फूटाचे बांधकाम, त्यात सात लाख चौरस फूटात कार्यालय आणि साडेतीन लाख चौरस फूटात वाहन तळांची व्यवस्था असलेला हे मुख्यालय भविष्यात पांढरा हत्ती तर ठरणार नाही ना अशी चर्चा सुरू झाली आहे.

सद्यस्थितीत ठाणे महापालिकेचे मुख्यालय पाचपाखाडी येथील दाटीवाटीच्या भागात आहे. या ठिकाणी वाहन तळाचीही फारशी व्यवस्था नाही. त्यामुळे मुख्यालयात कामकाजासाठी येणारे लोकप्रतिनिधी, नागरिक यांची वाहने मुख्यालयाबाहेरील निमुळत्या रस्त्यावर उभी करावी लागतात. एखादी सभा किंवा आंदोलन असले तर शहराचे मध्यवर्ती केंद्र कोंडीमय होऊन जाते. त्यावर उपाय म्हणून महापालिकेने रेमंड कंपनीच्या जागेवर आपले नवे मुख्यालय उभारण्याचे ठरविले आहे. परंतु या मुख्यालयाची रचना पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी अर्थसंकल्प सादर करताना, नव्या मुख्यालयाचा आराखडाच सादर केला. यामध्ये ही नवी इमारत ३२ मजल्यांची असेल असे नमूद केले आहे. एक लाख १६ हजार ९०३ चौ. मीटरचे बांधकाम क्षेत्र, त्यात ७१ हजार ४४ चौ. मीटरचे कार्यालय, ९ हजार ८५९ चौ. मीटरचे सभागृह असा तामझाम या इमारतीत असणार आहे. ठाणे महापालिका हद्दीत सध्या नऊ प्रभाग कार्यालय आहे. तसेच ३८ विभागांची लहान कार्यालयेही इतर ठिकाणी आहेत. सर्वसामान्यांच्या नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली ही विभाग कार्यालये अनेक ठिकाणी गैरसोयीने ग्रासली आहेत.

काही विभाग कार्यालयांची अवस्था फारशी चांगली नाही. मुख्यालयासाठी ३२ मजल्याची इमारत उभारताना नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या विभाग कार्यालयांकडे महापालिका लक्ष देणार का असा सवालही आता उपस्थित होत आहे. मुख्यालयाच्या ३२ मजली इमारतीत नेमके काय असेल याबाबतची स्पष्टता अद्याप नाही. या इमारतीसाठी राज्य सरकारचा निधी महापालिकेला मिळणार आहे. एखाद्या महापालिका मुख्यालयासाठी शासनाच्या निधीचा विनियोग करण्याची ही अपवादात्मक घटना असावी. अर्थसंकल्पात नमूद केल्याप्रमाणे यासाठी पहिल्या टप्प्यात ७२७ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. यामध्ये विद्युतीकरण, वातानुकूलीत यंत्रणा, फर्निचर, अंतर्गत सजावट याचा सामावेश नाही. त्यामुळे या कामाचा खर्च हजार कोटी रुपयांचा टप्पा ओलांडेल अशी शक्यता व्यक्त होत आहे. ३२ मजल्याची ही इमारत त्यामुळे पांढरा हत्ती ठरल्यास आश्चर्य वाटू नये.