ठाणे : जागतिक महिला दिना’निमित्त ठाणे महापालिका दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करते. यंदाही पालिकेने रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, निबंध स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आहेत. त्याचबरोबर महिलांसाठी वैद्यकीय शिबिर आयोजित केली असून या माध्यमातून पालिका लाडक्या बहिणींच्या आरोग्य काळजी घेणार आहे.
जागतिक महिला दिन ८ मार्च रोजी साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून ठाणे महापालिकेच्या महिला व बालविकास विभागाच्यावतीने विविध कार्यक्रम आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, निबंध स्पर्धा यांचा समावेश आहे. तसेच सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. शनिवार, ७ मार्च रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत ठाणे महापालिका मुख्यालय येथे रांगोळी, मेहंदी स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. रांगोळी स्पर्धेसाठी विषय भारतीय सणांवर आधारित असून ४ बाय ४ फूट जागेत रांगोळी साकारावयाची आहे. मेहंदी स्पर्धा पारंपरिक,अरबी,राजस्थानी पद्धतीने घेण्यात येईल. तसेच ठामपा शाळा क्र. ४४ वर्तकनगर येथे निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली असून निबंध स्पर्धेचा विषय डिजिटल भारत एक नवे युग, समाज माध्यम व आजची स्त्री, महापालिका विकासात महिला अधिकारी कर्मचारी यांची भूमिका असा असून शब्दमर्यादा एक हजार इतकी ठेवण्यात आली आहे. तसेच ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागातंर्गत कार्यरत असलेल्या आशा वर्कर्स यांचेसाठी स्वतंत्र निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार ८ मार्च रोजी ठाणे महापालिका आणि ‘आम्ही सायकलप्रेमी फाऊंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी ‘सायकल रॅली’चे आयोजन करण्यात आले आहे. रॅलीनंतर महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात महिलांची वेशभूषा स्पर्धा, सायकल सजावट स्पर्धा, उखाणा स्पर्धा होणार आहेत. तसेच यावेळी सायकलिस्ट मंगला पै यांना रणरागिनी जीवनगौरव पुरस्कार आम्ही सायकलप्रेमी फाऊंडेशनच्यावतीने दिला जाणार आहे.
लाडक्या बहिणींच्या आरोग्य काळजी
शनिवार ७ मार्च रोजी ठाणे महापालिकेच्या सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये महिलांकरिता विशेष आरोग्य शिबिर आयोजित केले आहे. या शिबिरात महिलांची हिमोग्लोबिन तपासणी, रक्त शर्करा व रक्तदाब तपासणी तसेच तज्ञां मार्फत महिला आरोग्यविषयक समुपदेशन करण्यात येणार आहे. सर्व आशा कार्यकर्ते अंगणवाडी व महिला सफाई कर्मचारी यांनी प्राधान्याने तपासणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच ८ मार्च मॅमोग्राफी शिबीर आयोजित केले आहे तसेच ९ मार्च रोजी गडकरी रंगायतन येथे देखील वैद्यकीय शिबिराचे आयोजन व मॅमोग्राफी व्हॅन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
लाभार्थी प्रमाणपत्राचे वाटप
राम गणेश गडकरी रंगायतन येथे ९ मार्च रोजी सकाळी १० वाजता समाज विकास विभागाच्या महिला व बालकल्याण विभाग अंतर्गत महिलांना विविध योजनांतंर्गत देण्यात येणाऱ्या लाभार्थी प्रमाणपत्राचे प्रातिनिधीक स्वरुपात वाटप महापौर शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच महापालिकेतर्फे घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण देखील यावेळी करण्यात येणार आहे. यानंतर ठाणे महानगरपालिकेतील महिला कर्मचाऱ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
पालिकेचे आवाहन
इच्छुक सहभागी महिला अधिकाऱ्यांनी आपली नावे विभागामार्फत महिला व बालविकास विभागाकडे नियोजित मुदतीत सादर करावीत. सर्व महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या उपक्रमात सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. तर, महिलांसाठी आयोजित केलेल्या उपक्रमात ठाणे महानगरपालिकेतील सर्व महिला अधिकारी व कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन महापौर शर्मिला पिंपळोलकर व महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.
