– प्रत्येक प्रभागातील मतदार संख्येत दहा हजाराहून अधिक वाढ

thane municipal election 2025 : ठाणे : येत्या काही महिन्यात होणाऱ्या ठाणे महापालिका निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचनेबरोबरच आरक्षण सोडत प्रक्रिया पालिका निवडणुक विभागाने उरकली असून त्यापाठोपाठ आता पालिकेने प्रारुप मतदार याद्याही उपलब्ध करून देण्याची तयारी केली आहे. या याद्यांनुसार, गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदारांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसून येते. २०११ च्या जनगणनेनुसार निवडणूक होत असल्याने गेल्या म्हणजेच २०१७ सालाप्रमाणेच यंदाही 33 प्रभागच आहेत. असे असले तरी गेल्या निवडणूकीच्या तुलनेत यंदा मतदार वाढल्याचे चित्र दिसून येत आहे.

ठाणे महापालिकेची निवडणूक जानेवारी महिन्यात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या निवडणुकीसाठी पालिकेच्या निवडणूक विभागाने गेल्या काही महिन्यांपासून तयारी सुरू केली आहे. चार सदस्यांचा एक प्रभाग याप्रमाणे ही निवडणुक होणार असून या निवडणुकीत एकूण ३३ प्रभाग असणार आहेत. त्यात ३२ प्रभाग चार सदस्यांचे तर, एक प्रभाग तीन सदस्यांचा असणार आहे. या प्रभागांची रचनाही पालिकेने काही दिवसांपुर्वीच अंतिम केली असून या प्रभागांमधील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण आणि महिला राखीव अशी आरक्षण प्रक्रियाही पुर्ण करण्यात आली आहे.

प्रभाग रचना

२०११ च्या जनगणनेनुसार ठाणे शहराची लोकसंख्या १८ लाख ४१ हजार ४८८ इतकी आहे. तर, २०१७ साली झालेल्या निवडणुकीत ३३ प्रभाग होते आणि मतदारांची संख्या १२ लाख २८ हजार ६०६ इतकी होती. या मतदार संख्येत गेल्या काही वर्षात वाढ झाली आहे. दर दहा वर्षांनी जनगणना केली जाते. परंतु करोनामुळे यंदा जनगणना होऊ शकली नाही. त्यामुळे २०११ च्या जणगणनेनुसार यंदा प्रभाग रचना अंतिम करण्यात आली असून ती जवळपास २०१७ प्रमाणेच आहे. यात चार सदस्यांच्या प्रभाग रचनेत ५० ते ६२ हजार लोकसंख्येचा एक प्रभाग तयार करण्यात आला आहे. तर, तीन सदस्यांचा प्रभाग ३८ हजार लोकसंख्येचा करण्यात आला आहे.

जनगणना जुनी पण, मतदार वाढले यंदाच्या निवडणुकीत एकूण १६ लाख ४९ हजार ८६२ इतके मतदार आहेत. त्यात ८ लाख ६३ हजार ८७४ पुरुष, ७ लाख ८५ हजार ८३० स्त्री आणि १५८ इतर मतदार आहेत. तर, २०१७ मध्ये एकूण मतदारांची संख्या १२ लाख २८ हजार ६०६ इतकी होती. त्यात ५ लाख ६१ हजार ८७ पुरुष, ६ लाख ६७ हजार ५०४ स्त्री आणि १५ इतर मतदारांचा समावेश होता. त्यामुळे यंदाच्या निवडणूकीत ४ लाख २१ हजार २५६ इतके मतदार वाढले आहेत. त्यात १ लाख ९६ हजार ३७० पुरुष, २ लाख २४ हजार ७४३ स्त्री आणि १४३ इतर मतदार वाढल्याचे दिसून येत आहे.