ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार )पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा बालेकिल्ला असलेल्या मुंब्रा परिसरातील प्रभाग क्रमांक ३० मध्ये एमआयएमचे चारही उमेदवार विजयी झाले आहेत. दोन्ही राष्ट्रवादीच्या मत विभाजनाचा एमआयएमला फायदा झाल्याचे उमेवारांना मिळालेल्या मतांच्या आकडेवारीतून समोर आले आहे. गेल्या निवडणुकीत एमआयएमचे दोन नगरसेवक निवडून आले होते, त्यात आता दोनने वाढ झाली आहे.
ठाणे महापालिका निवडणुकीचे निकाल शुक्रवारी जाहीर झाले. या निवडणुकीत कळवा आणि मुंब्रा भागात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार )पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार )पक्ष यांच्यात लढत असल्याचे चित्र होते. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार )पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार )पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला हे आपापले उमेदवार निवडून आणण्यासाठी जोरदार प्रचार करीत होते. मात्र, दोन्ही राष्ट्रवादीच्या मत विभाजनाचा एमआयएमला फायदा झाल्याचे उमेवारांना मिळालेल्या मतांच्या आकडेवारीतून समोर आले आहे.
ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 30 मधून एमआयएमचे उमेदवार नफिस अन्सारी, सहार युनूस शेख, शेख सुलताना अब्दुल मन्नान आणि डोंगरे शोएब फरीद हे चारही उमेदवार विजयी झाले. गेल्या निवडणुकीत एमआयएमचे दोन नगरसेवक निवडून आले होते, त्यात आता दोनने वाढ झाली आहे. या प्रभागातून अजित पवार गटाचे उमेदवार विजयी होतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु एमआयएमचे चारही उमेदवार विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे दोन्ही राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांची बेरीज केली तर ती या विजयी उमेदवारांना मिळालेल्या मतापेक्षा जास्त असल्याचे दिसून येत आहे.
