ठाण्याचा जकात नाका इतिहासजमा

जकात नाका शुक्रवार मध्यरात्रीपासून वस्तू व सेवा (जीएसटी) करामुळे इतिहासजमा झाला.

thane octrai naka
जकात नाका शुक्रवार मध्यरात्रीपासून वस्तू व सेवा (जीएसटी) करामुळे इतिहासजमा झाला.

मुंबई आणि ठाणे शहराच्या वेशीवर गेल्या काही वर्षांपासून वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरणारा मुंबई महापालिकेचा जकात नाका शुक्रवार मध्यरात्रीपासून वस्तू व सेवा (जीएसटी) करामुळे इतिहासजमा झाला.

काही वर्षांपूर्वी राज्य शासनाने महापालिकांमार्फत होणारी जकातवसुली रद्द केली होती. मात्र, मुंबई महापालिकेला त्यातून वगळण्यात आले होते.  मुंबई आणि ठाणे शहराच्या प्रवेशद्वारावर असलेल्या आनंदनगर नाक्यावर जकातवसुली सुरू होती. १९६५ मध्ये सुरू झालेल्या या जकात नाक्यावर दिवसाला दीड हजारपेक्षा अधिक वाहने येतात. दरम्यान, १ जुलैपासून संपूर्ण देशभरात लागू झालेल्या वस्तू-सेवाकर प्रणालीमुळे मुंबई महापालिकेची जकात पद्घत रद्द झाली असून या वसुलीसाठी शुक्रवार हा अखेरचा दिवस होता.

आनंदनगर जकात नाक्यावर एकूण १४४ कर्मचारी काम करतात. हा विभाग बंद होणार असल्याने त्यांची अन्य विभागात बदली करण्यात येणार आहे.  दरम्यान,या जकात नाक्यावर दररोज दीड हजार वाहनांकडून जकातवसुली केली जाते आणि त्यामध्ये दर वर्षी वाढ व्हायची, असे मुलुंड जकात नाक्याचे उपकर निर्धारक व संकलक रवींद्र मोरे यांनी सांगितले.

वसुलीची आकडेवारी

गेल्या वर्षी १ एप्रिल ते २९ जून या कालावधीत या जकात नाक्यावर २४० कोटी ६२ लाख ७८ हजार ९७२ इतकी वसुली झाली, तर याच कालावधीत २०१७ मध्ये २६० कोटी २६ लाख इतकी वसुली झाली.

निवृत्त अधिकाऱ्यांची हजेरी..

मुंबई महापालिकेचे जकात नाके इतिहासजमा होणार असल्यामुळे या विभागातून निवृत्त झालेले अधिकारी व कर्मचारी त्या ठिकाणी आले होते. या नाक्यावरील जुन्या आठवणींना त्यांनी पुन्हा एकदा उजाळा दिला. या वेळी त्यांचा पुन्हा निरोप समारंभाचा कार्यक्रमही या वेळी करण्यात आला.

गेल्या तीन दिवसांतील आकडेवारी २०१७

२७ जून – ३ कोटी ६१ लाख

२८ जून – ५ कोटी १५ लाख

२९ जून ३ कोटी ७४ लाख

३० जून (दुपारी ४ पर्यंत) सुमारे ३ कोटी

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Thane municipal jakat naka close after gst launch