ठाणे : कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्याकडून होत असलेल्या कथित समलैंगिक छळाला कंटाळून दोन तरुणांनी त्याची हत्या केली. याप्रकरणी सौरभ गोल्हे (२४) आणि ज्ञानेश्वर कंठे (२८) यांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना २४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली.

कल्याण-अहिल्यानगर मार्गावरील मामनोली परिसरात २८ जून या दिवशी एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. मृताची ओळख पटत नसल्याने कल्याण तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड आणि अपर पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. त्यानंतर मुरबाड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लाड, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दादासाहेब एडके आणि कल्याण तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा विशेष पथके तयार करून तपास सुरू करण्यात आला.

मृत व्यक्तीकडे मोबाईल नसल्याने त्याची ओळख पटविणे पोलिसांसमोर आव्हान होते. मात्र, त्याने परिधान केलेल्या शर्टच्या खिशाजवळ एका कंपनीचे बोधचिन्ह आढळले. ही कंपनी मुरबाड परिसरातील असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी तेथील कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू केली. त्यावेळी मृताची ओळख किशोरचंद्र साहू (४२) अशी पटली. त्या कंपनीत किशोरचंद्र हा पर्यवेक्षक म्हणून काम करत होता. त्यानंतर कंपनीतील सीसीटीव्ही चित्रफिती आणि कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आली. या तपासादरम्यान सौरभ गोल्हे आणि ज्ञानेश्वर कंठे यांच्यावर संशय बळावला. दोघांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.

अशी केली हत्या

– पोलिसांच्या माहितीनुसार, किशोरचंद्र साहू हे मुरबाड तालुक्यातील देवगाव परिसरातील रहिवासी होते. ते विवाहित असून त्यांची पत्नी मूळगावी ओडिशामध्ये राहते. आरोपी सौरभ गोल्हे हा रायता, तर ज्ञानेश्वर कंठे हा किन्हवली परिसरातील रहिवासी आहे. चौकशीदरम्यान आरोपींनी, किशोरचंद्र साहू हे त्यांच्यावर वारंवार समलैंगिक संबंधांसाठी दबाव टाकत होते. त्यामुळे ते मानसिक त्रासाला कंटाळले होते, असा दावा केल्याची माहिती पोलिसांनी दिली. वरिष्ठ अधिकारी असल्याने त्यांना विरोध करता येत नव्हता. त्यामुळे त्यांनी किशोरचंद्र साहू यांच्या हत्येचा कट रचला. त्यासाठी आठवडाभरापूर्वी धारदार शस्त्र खरेदी करण्यात आले. त्यानंतर २५ जूनला सौरभ याने दुचाकीवरून किशोरचंद्र साहू यांना मामनोली परिसरात नेले. तेथे धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून त्यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर मृतदेह जंगलात फेकून देण्यात आला. निर्जनस्थळ असल्याने तीन दिवस तो मृतदेह जंगलात पडून होता. या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना २४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डाॅ. विनयकुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल, मुरबाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लाड, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे दादासाहेब एडके, कल्याण तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकेश ढगे, साहाय्यक पोलीस निरीक्षक मंजुषा शिरसाठ, दत्तात्रय नलावडे, उपनिरीक्षक महेश कदम, भाऊसाहेब गायकवाड, उपनिरीक्षक जयवंत वारा, उपनिरीक्षक श्याम आरमाळकर, पोलीस हवालदार सतीश कोळी, गोविंद कोळी, हेमंत विभुते, पोलीस शिपाई स्वप्नील बोडके, सुरेश धिंदळे, प्रशांत बडगे, हरिश्चंद्र झांजे, पोलीस नाईक भाऊराव भोईर, हरेश लोणे, मुस्ताफा शेख, सुरेश सानप, सुनील फसाळे, अतुल खेडकर, योगेश निर्मळ, कुणाल बावदाने, अजित काळे, तुषार कोळी, रामा शिंदे, सायबर विभागाचे पोलीस हवालदार रविंद्र मोरे, दिपक गायकवाड यांच्या पथकाने केली.