ठाणे : ठाणे खाडीच्या दलदलीच्या भागात आढळलेल्या एका केशरी रंगाच्या लोखंडी पेटीपासून सुरू झालेला तपास थेट धारावीतील एका छोट्या कारखान्यापर्यंत पोहोचला आणि तेथून एका हत्येचा उलगडा झाला. शिळ-डायघर परिसरात २०२१ मध्ये घडलेल्या या क्लिष्ट हत्येच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे शिळ डायघर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक आणि सध्या अमली पदार्थविरोधी टास्क फोर्स, कोकण विभागाचे पोलीस उपअधीक्षक रामचंद्र मोहिते यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर झाले आहे.
डायघर येथील ठाणे खाडीच्या दलदलीच्या भागात २०२१ मध्ये एक केशरी रंगाची लोखंडी पेटी आढळून आली होती. या पेटीतून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत असल्याची माहिती मिळताच तत्कालीन पोलीस निरीक्षक रामचंद्र मोहिते यांच्यासह शिळ-डायघर पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या पेटीला तीन कुलपे होती. पोलिसांनी कटरच्या साहाय्याने ही कुलपे तोडल्यानंतर आत एका चादरीत गुंडाळलेला कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. याप्रकरणी शिळ-डायघर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला.
मृतदेहाची अवस्था पाहता त्याची ओळख पटविणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. अनेक प्रयत्न करूनही मृताची ओळख पटत नव्हती. त्यामुळे मोहिते यांनी तपासाची दिशा बदलत ही लोखंडी पेटी नेमकी कुठे तयार होते, याचा शोध घेण्याच्या सूचना पथकाला दिल्या. त्यानुसार पोलिसांनी मुंबई आणि ठाणे शहरात अशा प्रकारच्या पेट्यांचा शोध सुरू केला. तपासादरम्यान अशा पेट्या फक्त मुंबईतील धारावी परिसरात तयार होत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस पथकाने धारावीतील गल्लीबोळ पिंजून काढत पेट्या तयार करणाऱ्या कारखान्यांचा शोध सुरू केला. एका छोट्या कारखान्यात काही कारागीर काम करताना आढळले. कारखाना मालकाची माहिती घेऊन मोहिते यांनी संबंधित पेटीचे छायाचित्र त्याला पाठविले. पेटीवरील बोधचिन्ह पाहून ही पेटी त्याच्याच कारखान्यात तयार झाल्याचे स्पष्ट झाले. मात्र, तो अशा पेट्यांची घाऊक बाजारात विक्री करत असल्याने ग्राहकांची माहिती त्याच्याकडे नव्हती. चौकशीदरम्यान, सुमारे १५ दिवसांपूर्वी एक महिला तिच्या भावासोबत कारखान्यात आली होती आणि त्यांनी ही पेटी खरेदी केल्याचे त्याने सांगितले. विशेष म्हणजे, त्या महिलेचा मोबाईल क्रमांकही त्याच्याकडे होता.
पोलिसांनी या क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण केले असता, तो एका भांडी विक्रीच्या दुकानाशी संबंधित असल्याचे निष्पन्न झाले. पथकाने संबंधित दुकानात जाऊन चौकशी केली असता, ती महिला तेथे काम करत होती; मात्र तिने काही दिवसांपूर्वी काम सोडल्याचे समजले. पोलिसांनी दुकानदाराला तिच्याशी संपर्क साधून कामावर परत बोलावण्यास सांगितले. त्यानुसार अवघ्या १५ मिनिटांत ती महिला दुकानात पोहोचली आणि पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. चौकशीत तिनेच भावाच्या मदतीने प्रियकराची हत्या केल्याची कबुली दिली. पतीच्या मृत्यूनंतर तिची या तरुणाशी ओळख झाली होती. दोघेही एकत्र राहत होते. मात्र, संबंधित महिला त्याच्याकडे विवाहासाठी आग्रह धरत होती. तो विवाहास तयार नव्हता.
उलट गावी जाऊन कुटुंबीयांच्या पसंतीच्या मुलीशी विवाह करण्याच्या तयारीत होता. याची माहिती मिळाल्यानंतर महिलेने भावाच्या मदतीने त्याच्या डोक्यात प्रहार करून हत्या केली. त्यानंतर मृतदेह लोखंडी पेटीत भरून ती पेटी ठाणे खाडीच्या दलदलीच्या भागात फेकून दिली. या प्रकरणात न्यायालयाने आरोपी महिला आणि तिच्या भावाला जन्मठेपेची शिक्षा तसेच प्रत्येकी २० हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. अत्यंत क्लिष्ट अशा या हत्येच्या गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी मोहिते यांनी केलेल्या तपासाची दखल घेत त्यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर झाले आहे. या सन्मानामुळे त्यांचे सहकारी आणि नातेवाईकांकडून आनंद व्यक्त केला जात आहे.
