ठाणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने चौथे ‘नांदी संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. या साहित्य संमेलनात मुलाखत, परिसंवाद आणि दोन कवी सत्रांसह विविध साहित्यिक कार्यक्रम होणार आहेत. हे संमेलन रविवार, ६ सप्टेंबर रोजी मराठी ग्रंथ संग्रहालय, जिल्हा परिषद कार्यालयासमोर, नेताजी सुभाष पथ, ठाणे पश्चिम येथे होणार आहे.

महाराष्ट्र साहित्य परिषद, ठाणे जिल्हा शाखा आयोजित ‘नांदी संमेलन’चे उद्घाटन गझलकार आणि अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर यांच्या हस्ते होणार आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष खासदार नरेश मस्के असणार आहेत. तसेच कवी आणि गीतकार प्रकाश होळकर यांची विशेष उपस्थिती असणार आहे. कवी आणि साहित्यिक प्रा. अशोक बागवे संमेलनाचे अध्यक्षपद भूषविणार आहेत. संमेलनात कवी आणि गीतकार प्रवीण दवणे यांची मुलाखत होणार असून, युवा कवी प्रथमेश पाठक त्यांच्याशी संवाद साधणार आहेत.

त्याचप्रमाणे ‘आशय आणि अभिव्यक्ती यांचे नाते’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. पत्रकार, साहित्यिक आणि ग्रंथालीचे संस्थापक दिनकर गांगल या परिसंवादाचे अध्यक्ष असतील. या परिसंवादात लोकमतचे संपादक यदु जोशी, कवियत्री आणि लेखिका डॉ. निर्मयी फडके व सुनंदा भोसेकर सहभागी होणार आहेत. याशिवाय दोन कवी सत्रांचे आयोजन करण्यात आलेले असून यात पहिल्या कवी सत्राचे अध्यक्ष कवी साहित्यिक डॉ. महेश केळुसकर आणि दुसऱ्या कवी सत्राचे अध्यक्ष कवी व गीतकार अरुण म्हात्रे हे भूषविणार आहेत.

ठाणे जिल्ह्यातील नामवंत अनुपमा उजगरे, नारायण लाळे, राजीव जोशी, रवींद्र लाखे, भगवान निळे, किरण येले, साहेबराव ठाणगे, दुर्गेश सोनार, संदेश ढगे, सुजाता राऊत, वैभव दळवी, सुनंदा भोसेकर, प्रशांत डिंगणकर यांच्यासह छाया कोरेगावकर, संकेत म्हात्रे, सुप्रिया हळबे, मेगमेहेन, शिवानी गोखले, सोनाली लोहार, निकिता भागवत, मनीष तपासे, नामदेव कोळी, गीतेश शिंदे, मेघना साने, रामदास खरे, ऋग्वेद देशपांडे, ज्योती भारती, दिलीप पाटील, बाळ कांदळकर हे कवी यात सहभागी होणार आहेत. यावेळी ठाण्याच्या साहित्य, कला, उद्योग आणि सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सत्कारही करण्यात येणार आहे.