ठाणे : नारळी पौर्णिमेनिमित्त निघणाऱ्या मिरवणुकीमुळे कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी वाहतूक बदल लागू केले होते. परंतु पर्यायी मार्गांवर वाहनांचा भार वाढल्याने कळवा-विटावा, ठाणे स्थानक परिसराकडे जाणारे रस्त्यासह पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी झाली. या कोंडीत बस आणि रिक्षा अडकल्याने ठाणे स्थानक परिसरातील रिक्षा आणि बस थांब्यांवर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्या. अर्धा ते पाऊण तास निरीक्षक उपलब्ध होत असल्याने प्रवासी हैराण झाले होते.
नारळी पौर्णिमेनिमित्त कळवा खाडी पूल परिसरातील गर्दी नियंत्रित करण्यासाठी ठाणे वाहतूक विभागाने गुरुवार दुपारी १२ ते रात्री ११ वाजेपर्यंत विविध मार्गांवर वाहतूक बदल लागू केले होते. ठाण्यातून कळवा, मुंब्रा, विटावा आणि नवी मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना अनेक ठिकाणी प्रवेशबंदी करून पर्यायी मार्गाने वळवण्यात आले. मात्र, मुख्य मार्गावरील वाहतूक पर्यायी रस्त्यांवर वळल्याने या मार्गांवर वाहनांची संख्या अचानक वाढली आणि कोंडी निर्माण झाली. कळवा-विटावा भागात, ठाणे स्थानक परिसराकडे जाणारे रस्ते तसेच पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी झाली. त्याचा थेट परिणाम ठाणे शहरातील सार्वजनिक वाहतुकीवर झाला.
सायंकाळच्या गर्दीच्या वेळी वाहतूक कोंडी अधिक तीव्र झाल्याने ठाणे स्थानकातून घरी जाणाऱ्या प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले. रिक्षा मिळण्यासाठी प्रवाशांना तब्बल अर्धा ते पाऊण तास प्रतीक्षा करावी लागत होती. रिक्षा आणि बस कोंडीत अडकल्याने स्थानक परिसरात उपलब्ध असलेल्या वाहनांची संख्या कमी झाली आणि प्रवाशांची गर्दी वाढत गेली. स्थानकातून बाहेर पडलेल्या प्रवाशांना रिक्षा किंवा बस मिळत नसल्याने अनेक जण थांब्यावरच ताटकळत होते. रिक्षा कधी मिळणार, याचीच प्रवाशांना प्रतीक्षा होती. अर्धा ते पाऊण तास रिक्षासाठी थांबावे लागत असल्याने कामावरून घरी परतणाऱ्या प्रवाशांचा संताप वाढला. त्यामुळे वाहतूक नियोजनाचा उद्देश कोंडी टाळण्याचा असला तरी पर्यायी मार्गांवरील कोंडीने प्रवाशांचीच कोंडी झाल्याचे चित्र गुरुवारी सायंकाळी ठाण्यात पाहायला मिळाले.
