भिवंडी परिसरात देशातील एक उत्कृष्ट इकोनॉमिक कॉरिडॉर तयार करण्याचे नियोजन एमएमआरडीएच्या माध्यमातून करण्यात आले आहे. या ठिकाणी अद्ययावत लॉजिस्टिक पार्क, दळणवळणाच्या सोईसुविधा असतील, तसेच १० लाख लोकांना रोजगारही मिळेलस असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भिवंडी-माणकोली येथे सांगितले. माणकोली नाका येथील उड्डाणपुलाच्या उजव्या मार्गिकेचे उद्घाटन करताना ते बोलत होते. या उड्डाणपुलामुळे ठाणे-नाशिक मार्गावरील वाहतूककोंडीची समस्या बऱ्याच प्रमाणात दूर होण्यास मदत होणार आहे.

उड्डाणपुलाच्या कोनशिलेचे अनावरण केल्यानंतर तो वाहतुकीस खुला करण्यात आला. भिवंडी परिसराच्या सर्वांगीण कायापालटाचे नियोजन स्पष्ट करताना मुख्यमंत्र्यांनी स्थानिकांना रोजगारासाठी प्राधान्य देण्यात येईल, असे जाहीर केले. भिवंडीच्या विकासाचा आराखडा पूर्वीच्या सरकारच्या काळात तसाच पडून होता. आम्ही सत्तेवर आल्यानंतर त्याला गती दिली आणि काही महिन्यातच बदल दिसू लागला. या ठिकाणी ९८५ कोटींच्या विविध विकासकामांच्या निविदा काढण्यात आल्या. या भागातील ६० गावांमध्ये देशातील एक उत्तम लॉजिस्टिक पार्क उभारण्यात येईल. या ठिकाणी शाळा, दवाखाने, वाहतुकीच्या सोयी, इतर आवश्यक पायाभूत सुविधा असतील. संपूर्ण देशाच्या लॉजिस्टिकचे भिवंडी हे मुख्य केंद्र बनेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय सल्लागार नेमून गावठाणांचा आदर्श विकास करणे, ग्रामस्थांना उत्तम मोबदला देऊन त्यासाठीची जमीन घेणे या गोष्टी तातडीने सुरु करण्याचे निर्देशच त्यांनी एमएमआरडीएचे आयुक्त युपीएस मदान यांना दिले. यासाठी कुठल्याही प्रकारे निधी कामू पडू दिला जाणार नाही, असेही त्यांनी आश्वस्त केले.

एकात्मिक आणि चक्राकार वाहतूक व्यवस्था

केवळ मुंबईच नव्हे, तर मुंबई आणि परिसरातील वाहतुकीच्या समस्येकडे लक्ष देणे आवश्यक आहे हे लक्षात घेऊन आम्ही मेट्रोला प्राधान्य द्यावयाचे ठरविले असे सांगून, मुख्यमंत्री म्हणाले की गेल्या १० वर्षांत १० किमी मेट्रोचे कामही झाले नव्हते. ते आम्ही २ वर्षांत प्रत्यक्षात १२० किमीचे काम सुरूही झाले आहे. ठाणे-कल्याण-भिवंडी भागात ५५९ कोटींचे ५ उड्डाणपूल बनविण्यात येत आहेत. नजीकच्या काळात वंजारपट्टी, राजीव गांधी चौक ते साईबाबा मंदिर, ठाणे-भिवंडी, माणकोली- मोटा गाव अशा या वाहतूक प्रकल्पांमुळे या भागातील दळणवळण सुरळीत होऊन वाहतूकही वेगवान होईल.

मेट्रोमुळे कसा फरक पडतोय हे स्पष्ट करताना मुख्यमंत्री म्हणाले की, २ कोटी मोठ्या झाडांमुळे जितके कार्बन फूटप्रिंट कमी होतील तितके कार्बन फूटप्रिंट मेट्रोच्या मार्गांमुळे कमी होतील. त्यामुळे पर्यावरणाला पूरक अशी ही वाहतूक प्रणाली एकात्मिक रीतीने विकसित करण्याचे नियोजन मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ते म्हणाले की, मुंबई- ठाणे-कल्याण-भिवंडी- भाईंदर अशी एकात्मिक आणि सर्क्युलर वाहतूक व्यवस्था निर्माण केली जाईल, त्यामुळे एमएमआरडीए क्षेत्रातील सर्व छोटी-मोठी शहरे जोडली जातील. यासाठी दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनला सर्वेक्षणाचे काम दिले आहे.
कामे वेगवान पद्धतीने व्हावीत

आपल्या भाषणात मुख्यमंत्री खुसखुशीत टिप्पणी करताना अधिकाऱ्यांना टोला लगावला आहे. आमच्याकडे आता पुढील दोन-अडीच वर्षेच आहेत. त्यामुळे आमची सर्व कामे आम्हाला आटोपायची आहेत. आमच्या दृष्टीने वेगाला प्राधान्य आहे. तुम्ही निवृत्तीपर्यंत येथे राहाल; पण आम्हाला जनतेला कामे दाखवायची आहेत, असे ते म्हणाले.

वर्सोवा पुलासाठीही बैठक घ्या : पालकमंत्री

पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार कपिल पाटील यांचीही सुरुवातीला भाषणे झाली. वर्सोवा पुलासंदर्भातही मुख्यमंत्र्यांनी तातडीने बैठक बोलावून राष्ट्रीय महामार्गासह सर्व संबंधिताना निर्देश द्यावेत म्हणजे कामे वेळेत पूर्ण होऊन वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न सुटेल. तळोजापर्यंत आलेली मेट्रो कल्याणपर्यंत आणावी, अशी सूचना पालकमंत्र्यांनी केली. खासदार कपिल पाटील म्हणाले की, या क्षेत्रातील ३४ गावांमध्ये पिण्याच्या पण्याची समस्या सुटणे गरजेचे आहे. अजूनही या ठिकाणी केवळ ८ एमएलडी पाणी पुरविले जाते. भिवंडी हे नवी मुंबईसारखे नियोजनबद्ध शहर व्हावे, यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. आयुक्त मदान यांनी या पुलांमुळे वाहतुकीवरील ताण कसा दूर होणार आहे हे सांगितले.  राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार शांताराम मोरे, किसन कथोरे, महेश चौगुले, गणपत गायकवाड, एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, भिवंडी पालिका आयुक्त योगेश म्हसे आदी यावेळी उपस्थित होते.

असा आहे हा उड्डाणपूल

उड्डाणपुलाच्या ४ मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. याची लांबी ६५०.३३ मीटर इतकी असून उर्वरित ४ मार्गिकांचे काम सुरु आहे. हा उड्डाणपूल माणकोली नाक्यावर असून दुसरा पूल भिवंडी कल्याण जंक्शन येथे असेल. सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चरने याचे बांधकाम केले आहे. दोन्ही उड्डाणपुलांचा खर्च सुमारे १२१ कोटी इतका असेल. या मार्गिका खुल्या केल्यामुळे माणकोली नाका येथे होणारी प्रचंड वाहतूककोंडी दूर होईल. पुलाचे बांधकाम करताना स्टेमच्या पाणी वाहून नेणाऱ्या जलवाहिन्या, बीपीसीएलच्या वाहिन्या तसेच आसपासची दुकाने व इतर बाबींमुळे पुलाचे काम मध्यंतरीच्या काळात रखडले होते, अशी माहिती यावेळी देण्यात आली.