ठाणे – ‘टॅग’ संस्थेच्या ‘चित्रगंध’ उपक्रमांतर्गत राष्ट्रीय शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलची आयोजन करण्यात आले होते. यावेळी देशभरातून आलेल्या ५१ लघुपटांमधून अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या ११ लघुपटांचे चित्रिकरण झाले. या महोत्सवात मराठी, हिंदी आणि बंगाली भाषांतील लघुपटांचे सादरीकरण करण्यात आले. तसेच ‘गोंधळ’ चित्रपटाचे दिग्दर्शक संतोष डावखर यांची मुलाखत घेण्यात आली. हा महोत्सव राम गणेश गडकरी रंगायतन येथे पार पडला

टॅग संस्थेच्या चित्रगंध उपक्रामांतर्गत आयोजित स्पर्धेसाठी देशभरातून ५१ लघुपटांच्या प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या. त्यातून अंतिम फेरीसाठी ११ लघुपटांची निवड करण्यात आली होती. या मध्ये ‘ऍन ऑयस्टर लाईफ’ ‘द एल्टर इको’, ‘नजर’,‘अतुट’,‘जेमा’,‘भिंतीला पाठ’,‘परतफेड’,‘झाडावर कोरलेली गोष्ट’,‘कुस’,‘ब्रम्हकमळ’, ‘विशु कनि’ अशा लघुपटांची प्रदर्शन करण्यात आले. त्यानंतर या महोत्सवाला मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंत दिग्दर्शक आणि कलाकारांसह नुकत्याच ऑस्करसाठी निवड झालेल्या ‘गोंधळ’ या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक संतोष डावखर यांची मुलाखत अभिनेते कुशल बद्रिके आणि दिग्दर्शक विजु माने यांनी घेतली. यावेळी डावखर यांनी ‘गोंधळ’ चित्रपटाची संकल्पना, चित्रपटाची निर्मिती करताना आलेले अनुभव तसेच चित्रपट ऑस्करच्या निवड प्रक्रियेपर्यंत पोहोचण्याचा प्रवास याबाबत त्यांना माहिती दिली. पहिल्याच चित्रपटातून वेगळा विषय मांडण्याचा प्रयत्न आणि त्यासाठी केलेली तयारी याविषयीही त्यांनी संवाद साधला.

यावेळी लेखक-दिग्दर्शक विजय मौर्य यांची विशेष उपस्थिती होती. हा महोत्सव राम गणेश गडकरी रंगायतन येथे पार पडला असून या महोत्सवातून विविध भाषांतील लघुपट पाहण्याची संधी ठाणेकरांना मिळाली.