ठाणे : नौपाडा येथील हरिनिवास चौकाजवळील ७० वर्ष जुन्या एकमजली इमारतीच्या सज्जाचा भाग कोसळल्याची घटना रविवारी उघडकीस आली. या घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याचे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
हरिनिवास चौक येथील हनुमान मंदिराजवळ निकम हाऊस ही एकमजली इमारत आहे. ही इमारत ठाणे महापालिकेने धोकादायक ठरवत इमारत रिक्त करुन संरचनात्मक दुरुस्ती करण्याचे घोषित केले होते. रविवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास इमारतीच्या सज्जाचा काही भाग अचानक कोसळला. तसेच इमारत अत्यंत धोकादायक स्थितीत झाली होती.
घटनेची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला मिळाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच इमारतीत वास्तव्य करणाऱ्या निकम कुटुंबियांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून इमारतीमध्ये न राहण्याबाबत सूचित केले.
या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. दरम्यान, ठाणे महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या इमारतीबाबत पुढील कारवाई केली जात होती.
