ठाणे : ठाण्यातील नौपाडा भागात हायप्रोफाईल वेश्या व्यवसाय उघड करण्यास पोलिसांना यश आले असून याप्रकरणात जाहिराती आणि मालिकांमध्ये सह अभिनेत्री म्हणून काम करणाऱ्या तरुणीला पोलिसांनी अटक केली आहे. तर माॅडलिंग करणाऱ्या तरुणीसह दोघींची वेश्या व्यवसायातून सुटका केली. अभिनय क्षेत्रात काम मिळत नसल्याने त्या सह अभिनेत्रीने वेश्या व्यवसाय सुरु केल्याची बाब तपासात उघड झाली आहे. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाण्यात वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती ठाणे पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षास प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने बनावट ग्राहकाच्या आधारे तरुणीला संपर्क साधला. त्यानंतर पथकाने तिला नौपाडा भागातील एका हाॅटेलमधून ताब्यात घेतले. तिच्यासोबत दोन मुलींची देखील सुटका करण्यात आली. पोलिसांनी तिला अटक केल्यानंतर तिने गुन्ह्याची कबूली दिली.
अभिनय क्षेत्रात काम मिळत नव्हते म्हणून…
अटकेत असलेली २८ वर्षीय अभिनेत्री मुंबईतील ओशिवारा भागात मैत्रिणींसोबत एका सदनिकेत मागील तीन महिन्यांपासून वास्तव्यास आहे. ती जाहिराती आणि मालिकांमध्ये सह अभिनेत्री म्हणून काम करत होती. तिची आई, भाऊ हे हरियाणा येथे त्यांच्या गावी राहतात. अभिनय क्षेत्रातून मिळणाऱ्या मानधनातून ती घर खर्च चालवित असे. तसेच तिच्या गावी देखील आईकडे पैसै पाठवित होती. परंतु तिला आता क्षेत्रात काम मिळत नव्हते. एका क्लबमध्ये पार्टीसाठी गेली असताना तिची ओळख एका महिलेसोबत झाली. तिने तिला वेश्या व्यवसाय सुरु करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर तिने वेश्या व्यवसायाला सुरुवात केली. ग्राहकांकडून ती ३० हजार रुपये घेत असे. त्यातील १० हजार रुपये वेश्या व्यवसायातील पिडीत मुलीला आणि २० हजार रुपये स्वत: जवळ ठेवत असल्याची कबूली दिली.
माॅडेल अटकेत
पोलिसांनी याप्रकरणात दोन पिडीत महिलांची सुटका केली. यातील एक महिला ३४ वर्षांची आहे. ती विवाहित असून पतीचे सात वर्षांपूर्वी निधन झाले. तिला एक मुलगी आणि मुलगा असून ते अंधेरीतील वर्सोवा भागात राहतात. महिला माॅडेलिंग म्हणून काम करत होती. परंतु आता काम मिळत नसल्याने तसेच आर्थिक चणचणीमुळे तिने हा मार्ग निवडल्याचे तिने सांगितले. तर दुसरी महिला मालाडा येथे तिच्या आईसोबत वास्तव्यास असून ब्युटी पार्लर व्यवसाय करत होती. मागील काही महिन्यांपासून या दोघीही अभिनेत्रीच्या संपर्कात होत्या.
