ठाणे : ठाणे शहरातील नौपाडा भागात असलेल्या एका भल्ल्यामोठ्या उच्चभ्रु इमारतीत शनिवारी रात्री आग लागल्याची घटना उघडकीस आली आहे. ३० मजली इमारतीच्या २६ व्या मजल्यावरील एका रुममध्ये ही आग लागल्यामुळे गृह संकुलात भितीचे वातावरण पसरले होते. या आगीमुळे इमारतीत आणि इमारतीच्या आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडाल्याचे चित्र होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवित हानी झाली नाही.
ठाणे स्थानक परिसरापासून नौपाडा हा भाग अवघ्या काही अंतरावर आहे. त्यामुळे हा परिसर शहरातील एक महत्त्वाचा परिसर मानला जातो. या परिसरात साड्यांचे, कपड्यांचे तसेच दागिन्यांचे आणि इतर काही वस्तूंचे मोठमोठी दुकाने आहेत. तीन ते चार मजली इमारतींसह या परिसरात अनेक उच्च मजली इमारती देखील आहेत. तर, या परिसरात काही शाळा देखील आहेत.
या नौपाडा भागाला लागूनच भास्कर कॉलनी आहे. या भास्कर कॉलनी जवळ गिरीराज ड्रीम्स ही भल्लीमोठी सोसायटी आहे. तळ अधिक ३० मजली ही इमारत आहे. या इमारतीतील २६ व्या मजल्यावरील मिलिंद देसाई यांच्या रुममध्ये शनिवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीमुळे गृहसंकुलात भितीचे वातावरण पसरले. सर्व रहिवाशांमध्ये नेमकी ही आग कशी लागली याची चर्चा रंगली. इमारतीच्या आजूबाजूच्या परिसरात देखील या आगीमुळे खळबळ उडाली होती.
परंतू, काही काळानंतर समजले की, ही आग त्या घरातील बेडरूममध्ये लागली आहे. ही आग लागली त्यावेळी घरात कोणीही उपस्थित नव्हते. या आगीच्या धुराचे लोट संपूर्ण परिसरात पसरले होते. आग लागल्याचे समजताच इमारतीतील नागरिक सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून इमारतीच्या बाहेर पडले.
या घटनेची माहिती इमारतीतील एका रहिवाशाने ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाला दिली. घटनेची माहिती मिळताच, ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी, महावितरणचे अधिकारी, ठाणे अग्निशमन दलाचे जवान दोन अग्निशमन वाहन आणि एक रेस्क्यू वाहनासह तसेच नौपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
ही आग अग्निशमन दलाच्या जवानांकडून रात्री ९ वाजताच्या सुमारास पूर्णपणे विझविण्यात आली. या आगीत बेडरूममधील पंखा, एसी युनिट, कपाट, बेड, कागदपत्रे आणि इतर साहित्य जळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही,सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने देण्यात आली.
