ठाणे : शहराच्या मध्यवर्ती भागातील नौपाडा परिसरात उभारण्यात येत असलेल्या एका निर्माणाधीन इमारतीत सोमवारी रात्री एका ७ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकारानंतर सर्वच स्तरातून संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी नौपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करुन अवघ्या दोन तासांत आरोपीला अटक केली आहे.

नौपाडा परिसरात इमारतीचे बांधकाम सुरु आहे. या इमारतीत मजूरीचे काम करणारे काही कामगार राहतात. त्यापैकी एका मजूराची मुलगी सोमवारी रात्री ८.३० वाजता एकटी होती. त्यावेळी एका मजूराने त्यांच्या खोलीत प्रवेश केला आणि त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या घटनेमुळे ती मुलगी प्रचंड भेदरली होती. वडिल घरी आल्यानंतर तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला. यानंतर तिच्या वडिलांनी नौपाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीचा शोध सुरु केला. अवघ्या दोन तासांत पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला अटक केली.

लैंगिक अत्याचार करणारा आराेपी हा पिडीत मुलीच्या वडिलांच्या परिचित असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दरम्यान, या घटनेनंतर सर्वच राजकीय पक्षांनी संताप व्यक्त करत आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे. मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना पत्र पाठवून शहरातील निर्माणाधीन इमारतीमध्ये काम करणाऱ्या मजूरांची नोंदणी आणि पडताळणी सक्तीने करण्याची विनंती पोलिसांना केली.