ठाणे : दिवाळीच्या काळात ठाणे रेल्वे स्थानक परिसर, नौपाडा आणि राम मारुती रोड भागात खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होते. त्यामुळे या परिसरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. ही कोंडी टाळण्यासाठी नौपाड्यातील व्यापाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. शुक्रवारी व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने ठाणे वाहतूक शाखेच्या साहाय्यक पोलीस आयुक्त अंजली भोईर यांची भेट घेऊन वाहतूक नियोजनासंदर्भात निवेदन दिले. तसेच, दिवाळीच्या काळात प्रमुख चौकांमध्ये वाहतूक साहाय्यक नेमण्याची मागणी केली.

ठाणे रेल्वे स्थानक परिसर, नौपाडा आणि राम मारुती रोड भागात विविध वस्तूंची दुकाने मोठ्या संख्येने आहेत. दिवाळीनिमित्त या बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढते. त्यातच या भागातील रस्ते अरुंद असल्याने वाहनांची वर्दळ आणि बेशिस्त पार्किंगमुळे वाहतूक कोंडीत भर पडते. याचा फटका व्यापाऱ्यांसह खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांनाही बसतो. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सायंकाळी नौपाड्यातील व्यापाऱ्यांनी साहाय्यक पोलीस आयुक्त अंजली भोईर यांची भेट घेतली. १ ते १२ नोव्हेंबर या कालावधीत वाहनांसाठी पार्किंगची सुविधा उपलब्ध करून द्यावी, प्रमुख चौकांमध्ये वाहतूक साहाय्यक नेमावेत, तसेच वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणी वाहतूक पोलीस कर्मचारी तैनात करून दिशादर्शक फलक उभारावेत, अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. दिवाळीच्या काळात नौपाडा बाजारपेठेतील वाहतूक सुरळीत ठेवणे हा या मागण्यांमागील उद्देश असल्याचे व्यापारी संघटनेचे मितेश शहा यांनी सांगितले.