ठाणे : ठाण्यातील नौपाडा परिसरात एका बंगल्याची संरक्षण भिंत रस्त्यावर कोसळल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. भिंत कोसळल्याने काही काळ परिसरात धावपळ उडाली. मात्र, सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याने मोठी दुर्घटना टळली. घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षासह संबंधित विभागांच्या पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

नौपाड्यातील राम मारुती रोड परिसरातील ज्येष्ठ वास्तुविशारद मुकुंद काशिनाथ नातू पथ येथील वृंदावन बंगल्याची संरक्षण भिंत शुक्रवारी सकाळी ९.३२ वाजण्याच्या सुमारास रस्त्यावर कोसळली.

घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व अतिक्रमण विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जेसीबीच्या मदतीने रस्त्यावर पडलेला भिंतीचा मलबा हटविण्यात आला असून, नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकापट्टी लावण्यात आली आहे. दरम्यान, संबंधित बंगल्याची इमारत अति-धोकादायक (सी-१ श्रेणी – राहण्यास अयोग्य व तत्काळ निष्कासित करणे) म्हणून घोषित करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.